भारतीय अर्थव्यवस्था चिंताजनक अवस्थेकडे
![It would be a big mistake to sell government banks to industry groups - Raghuram Rajan](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/Raghuram-Rajan-3-1.jpg)
आर्थिक विकासाचा वेग मंदावलेली भारताची अर्थव्यवस्था वाढत्या तुटीमुळे ‘चिंताजनक’ अवस्थेकडे वाटचाल करीत आहे. तिची प्रकृती गंभीर होण्याची चिन्हे आहेत, असा इशारा रिझव्र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे.
अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठात झालेल्या ओ. पी. जिंदाल व्याख्यानमालेत रघुराम राजन यांनी भारतीय अर्थव्यववस्थेबद्दल गंभीर भाष्य केले. निश्चलनीकरण आणि घाईघाईत केलेली वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी हेघटकही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मोडण्यास कारणीभूत ठरले, असे निदान राजन यांनी केले.
भारताचा विकास दर २०१६च्या पहिल्या तिमाहीत ९ टक्के होता. तेथून तो घसरण्यास सुरुवात झाली. जून २०१९ला संपलेल्या तिमाहीत भारताच्या आर्थिक विकासाचा दर गेल्या सहा वर्षांत सर्वात कमी म्हणजे ५ टक्क्यांवर आला. त्यामुळे २०१९-२० या वर्षांसाठी हा दर ६.१ इतका कमी होईल, असा अंदाज रिझव्र्ह बँकेने व्यक्त केला आहे.
आर्थिक विकासाचा दर खूप घसरला असून, वित्तीय तूटही मोठी असल्यामुळे विकासाबाबत फार काही करण्यास वाव नाही. रिझव्र्ह बँकेने व्यक्त केलेला अंदाज हा नजीकच्या काळात या परिस्थितीत बदल होणार नसल्याचेच निदर्शक आहे. राज्ये आणि केंद्र यांच्या ७ टक्के इतक्या एकत्र वित्तीय तुटीपेक्षा प्रत्यक्ष वित्तीय तूट आणखी जास्त असू शकते, असे राजन म्हणाले.
निश्चलनीकरण आणि जीएसटी या घटकांचाही अर्थव्यवस्थेचा कणा मोडण्यात हातभार लागल्याचे दिसते. अर्थव्यवस्था तुलनेने कमजोर झाली असतानाच हे निर्णय घेण्यात आले, असे मत राजन यांनी व्यक्त केले.