बेळगावात ओवेसी यांनी बांधला भगवा फेटा
बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्त्ववादी ताकदींवर कडाडून टीका करणारे एमआयचे खासदार असदूद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी चक्क भगव्या रंगाचा फेटा परिधान करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी ही खेळी खेळल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली.
कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून, भाजप- काँग्रेस- निधर्मी जनता दलाचे एकमेकांवर जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. बेळगाव येथे धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या ओवेसी यांनी भगवा फेटा परिधान केला होता.
काँग्रेस पक्ष आणि तात्पुरते मुख्यमंत्री सिद्धारामय्या मला गेल्या तीन वर्षापासून कर्नाटकात येऊ देत नव्हते. काँग्रेस आता घरी जाणार आहे. त्यामुळे मला येथे जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. राहुल गांधी धर्मनिरपेक्षवादाचे दुकान उघडून तर पंतप्रधान मोदी राष्ट्रवादाचे दुकान उघडून राजकारण करीत आहेत. या दोघांनी फक्त पाच मिनीटे माझ्याशी चर्चा करावी, ‘मी दोघांचीही दुकाने बंद करीन. निधर्मी कोण आणि राष्ट्रावादी कोण हे जनतेला चांगले माहिती आहे,’ असा टोला ‘एमआयएम’चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लगावला. सीपीएड मैदानावर आयोजित निधर्मी जनता दलाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलत होते.