बलात्काऱ्याला नपुंसक बनवणार; पाकिस्तानात कठोर कायद्याला मंजुरी
![To make the rapist impotent; Approves stricter laws in Pakistan](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/पाकिस्तानात-बलात्काऱ्याला-नपुंसक.jpg)
इस्लामाबाद – बलात्कारासारख्या अमानुष गुन्ह्याविरोधात कठोर कारवाई व्हावी यासाठी आता पाकिस्तानात कायदा करण्यात आला आहे. बलात्कार प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी करणे आणि कठोर शिक्षा देण्याची या कायद्यात तरतूद आहे. इतकेच नाही तर दोषी आढळलेल्या व्यक्तीला नपुंसक करण्याचा उल्लेखही या कायद्यात आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी मंगळवारी या नव्या कायद्यावर स्वाक्षरी केल्याचे कळते आहे.
राष्ट्रपती भवनाकडून याबाबत निवेदन प्रसिद्ध करण्यात आले असून या नव्या अध्यादेशांतर्गत बलात्कार प्रकरणांची लवकर सुनावणी व्हावी यासाठी देशभरात विशेष न्यायालये उभारली जाणार आहेत. तसेच चार महिन्याच्या आत या प्रकरणांचा निकाल लावला जाईल. निवेदनात देण्यात आलेल्या माहितीनुसार, वारंवार गुन्हा करणाऱ्यांना नपुंसक बनवण्यात येईल. दरम्यान, नव्या कायद्यामध्ये बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात सहभागी असणाऱ्यांचं नॅशनल रजिस्टर तयार केलं जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे नव्या अध्यादेशानुसार, पीडितेची ओळख जाहीर करण्यास मनाई आहे आणि तसे केल्यास शिक्षा होऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, लाहोर शहराबाहेर एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर पाकिस्तानात प्रचंड संताप उसळला होता. त्यानंतर हा कायदा आणण्यात आला आहे. पीडित महिला आपल्या दोन मुलांसोबत लाहोरला जात असताना हायवेवर तिच्यावर हल्ला करण्यात आला. ही घटना घडली तेव्हा महिलेची दोन मुलेही तिथे उपस्थित होती. दरम्यान, लाहोरच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बलात्कारासाठी महिलादेखील जबाबदार असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त झाल्यानंतर सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे.