फोडा आणि झोडा हेच कॉंग्रेसचे धोरण
- कर्नाटकातील प्रचार सभेत मोदींचा आरोप
विजयपुरा – फोडा आणि झोडा हेच धोरण कॉंग्रेसने आजवर अवलंबले आहे. या पक्षाला कर्नाटकातून पुर्ण नेस्तनाबूत करा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. कर्नाटकातल्या विजापुर जिल्ह्यातील विजयपुरा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. कर्नाटकातील सिद्धरामैय्या यांचे सरकार भ्रष्टाचारात गुंतले आहे असा आरोप करताना त्यांनी म्हटले आहे की या सरकारमध्ये एकही असा मंत्री नाही की त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही.
ते म्हणाले की जात आणि धर्माच्या नावावर भांडणे लावणे आणि समाजात फूट पाडून नंतर त्याचा राजकीय लाभ उठवणे हेच कॉंग्रेसचे धोरण राहिले आहे. भावाभावात भांडणे लावण्याचे काम त्यांनी केले आहे. पण त्यांचे हेतु या भूमीतील जनता साध्य करून देणार नाही असे त्यांनी नमूद केले. यावेळी मोदींनी 12 व्या शतकातील सुधारणावादी बसवेश्वर यांच्या नावाचा अनेकदा उल्लेख केला. बसवेश्वरांना लिंगायत समाज हा श्रद्धेने पुजत असतो. त्यामुळे लिंगायत समाजाला आपलेसे करण्यासाठी त्यांनी बसवेश्वरांचा अनेकदा उल्लेख केला.
कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारवर आणि मुख्यमंत्र्यावर करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना नोटीसा पाठवल्या आहेत. आपल्यावरील खोट्या आरोपबाबत माफी मागा अन्यथा शंभर कोटी रूपयांची नुकसानभरपाई द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा या सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करताना मोदी म्हणाले की राज्यातील भ्रष्ट नसलेल्या एका मंत्र्याचे नाव कोणीही मला सांगावे.
राहुल गांधींकडे निवडणूक लढवण्याची क्षमता नाही असे नमूद करताना मोदी म्हणाले की आता कॉंग्रेसच्या अन्य नेत्यांनाही राहुल गांधी यांच्या क्षमतेवर विश्वास राहिलेला नाही.