प्रियकराने लग्नाचा तगादा लावल्याने तरुणीची आत्महत्या
नाशिक | लग्नासाठी तगादा लावत वारंवार फोन करत त्रास दिल्याच्या जाचाला कंटाळून खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेने आत्महत्या केल्याप्रकरणी संशयित प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. आॅगस्ट २०१९ मध्ये या तरुणीने विष प्राशन करत आत्महत्या केली होती. परिचारिकेच्या वडिलांच्या तक्रारीनुसार ७ महिन्यानंतर संशयिताच्या विरोधात म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित हिरामण अरुण किलबिले हा वारंवार तरुणीला फोन करून माझ्याशी लग्न कर, अशी सातत्याने मागणी करत होता. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून मुलीने विष प्राशन करून २५ आॅगस्ट २०१९ रोजी आत्महत्या केली होती. एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी संशयिताच्या विरोधात म्हसरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली.सोमवारी (दि. १७) संशयिताला याप्रकरणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. संशयिताला नाशिक राेड मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले.