पुलवामात भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागात आज भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात सुरक्षादलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. तसेच परिसरात शोध मोहीम सुरूच असून पुलवामातील टिकन परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू आहे. सीआरपीएफच्या १८२व्या बटालियन आणि जम्मू-काश्मीर पोलीस हे संयुक्त अभियान राबवत आहेत. या परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याचा अंदाज आहे.
वाचा :-जम्मू-काश्मीरमध्ये सिंगपुरा येथे झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात 3 नागरिक जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाने पुलवाम्यातील टिकन गावात मिळालेल्या माहितीच्या आधारे ही शोधमोहीम सुरू केली होती. या दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.
दरम्यान, गेल्याच महिन्यात जम्मू-काश्मीरच्या नगरोटा परिसरात भारतीय लष्कराने मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला होता. या भागातून काही दहशतवादी मोठा शस्त्रसाठा घेऊन जात होते. त्यावेळी भारतीय लष्कराने जम्मू-श्रीनगर महामार्गावरील बान टोलनाक्यावर त्यांचा ट्रक अडवला होता. यावेळी दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार झाला होता. या चकमकीत भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. यंदाच्या वर्षात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर झालेली ही दुसरी मोठी चकमक होती. यापूर्वी जानेवारी महिन्यात महामार्गावर झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.





