पुलवामातील जोरदार चकमकीत ३ अतिरेकी ठार, एक जवान शहीद
श्रीनगर | जम्मू-काश्मीरच्या पुलवामातील जदुरा भागात आज पहाटे अतिरेकी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात झालेल्या जोरदार चकमकीत ३ अतिरेकी ठार झाले. मात्र या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. सुरक्षा दलाच्या कारवाईमुळे गेल्या २४ तासात झालेल्या २ चकमकींमध्ये ७ अतिरेक्यांचा खातमा झाला आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिली.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामात काही अतिरेकी दडून बसले असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानुसार जम्मू-काश्मीर पोलीस, राष्ट्रीय रायफल दलाचे जवान आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने या भागात संयुक्त शोध मोहीम हाती घेतली. त्यावेळी पुलवामाच्या जदुरा भागात दडून बसलेल्या अतिरेक्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलानेही चोख प्रत्युत्तर दिले. त्यात ३ अतिरेकी मारले गेले, तर अतिरेक्यांच्या गोळीबारात १ जवान जबर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला, असे कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले.
चकमकीत ठार झालेल्या अतिरेक्यांकडून एक एके-४७ रायफल आणि दोन पिस्तुलांसह मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. शुक्रवारी शोपियॉत झालेल्या चकमकी ४ अतिरेकी ठार झाले होते. त्यामुळे गेल्या २४ तासात झालेल्या २ चकमकींमध्ये एकूण ७ अतिरेकी ठार झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.