पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मूर्तींवर होणार वज्रलेप प्रक्रिया
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Viththal_Rukmini.jpg)
लाखो वारकऱ्यांचे श्रधास्थान असलेला विठूराया आणि रुक्मिणीमातेच्या मूर्तीवर वज्रलेप करण्यात येणार आहे. आषाढी यात्रेपूर्वी हा वज्रलेप करण्यात येणार असून याकामी शासनाकडून रितसर परवानगी मिळाल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. यापूर्वी देवाच्या मूर्तीला तीन वेळा वज्रलेप करण्यात आला होता.
सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी वर्षभरातून साधारणपणे सव्वा ते दीड कोटी भाविक पंढरपुरात दाखल होत असतात. विठुरायाची ही मूर्ती वालुकाश्म दगडाची असून अनेक वर्षांपासून मूर्तीवर झालेल्या महापुजांमुळे तिची झीज झपाट्याने होत गेली. त्यामुळे सन २००९ पासून इथल्या महापूजा बंद करण्यात आल्या. मात्र, मूर्तीचे संवर्धन व्हावे तिची झीज होऊ नये म्हणून पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार विठ्ठलाच्या मूर्तीला वज्रलेप करण्याचा निर्णय घेण्यात आला.
१९ फेब्रुवारी १९८८ साली मूर्तीवर पहिल्यांदा एपॉक्सीचा लेप देण्यात आला होता. यानंतर २४ मार्च २००५ आणि शेवटची प्रक्रिया १८ ते २० मार्च २०१२ मध्ये वज्रलेप करण्यात आला होता. खरतरं दर पाच वर्षांनी लेप द्यावा अशा सूचना पुरातत्व विभागाच्या होत्या. मात्र, गेली आठ वर्षे याकडे दुर्लक्ष झाले होते.
मात्र, आता १६ मार्च रोजी मंदिर समितीच्या माध्यमातून विधी व न्याय खात्याकडे विठ्ठलमूर्तीला वज्रलेप करण्याची परवानगी मागितली होती, त्याला आज परवानगी मिळाली. हा वज्रलेप आषाढी एकादशी पूर्वी करण्याचा प्रयत्न मंदिर समिती करणार आहे. वज्रलेप करीत असताना विठ्ठलाचे दर्शन बंद ठेवावे लागते. सध्या टाळेबंदीमुळे ३० जूनपर्यंत मंदिर बंद असणार आहे. या कालावधीतच हा विठ्ठलाच्या मूर्तीस वज्रलेप करण्यात येईल, असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी स्पष्ट केले.