पंजाबच्या तरनतारन मध्ये स्फोट, २ ठार ११ जण जखमी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/blast.jpg)
पंजाब | महाईन्यूज
पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यात एका धार्मिक यात्रेत झालेल्या फटाक्यांच्या स्फोटात २ जण ठार झाले तर ११ जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. पंजाब पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे. या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. एका ट्रॅक्टर ट्रॉलीवर फटाके होते. ज्याचा स्फोट झाला त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी ही माहिती दिल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे.
सुरुवातीला १४ जणांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली होती. मात्र पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. धार्मिक यात्रेदरम्यान अनेक लोक फटाके उडवत होते. त्यावेळी एका फटाक्याच्या ट्रॉलीवर बरेचसे फटाके होते. या फटाक्यांवर एक जळता फटाका पडून हा अपघात झाला अशी माहिती एसपीएस परमार यांनी दिली आहे. हा स्फोट एवढा भयंकर होता की ट्रॉलीही उद्ध्वस्त झाली असंही पोलिसांनी सांगितलं आहे.