नोटांवर लक्ष्मीदेवीचा फोटो छापा, रूपया मजबूत होईल : सुब्रमण्यम स्वामी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/swamy-main.jpg)
मध्यप्रदेश | महाईन्यूज
भारतीय जनता पक्षाचे नेता आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या होणाऱ्या घसरणीबाबत एक अजब विधान केलेलं आहे. ‘भारतीय चलनाची स्थिती सुधारण्यासाठी नोटांवर देवी लक्ष्मीचे छायाचित्र छापण्याच्या बाजूने आपण आहोत’, असे स्वामी म्हणाले आहेत.
सुब्रमण्यम स्वामी यांचे मंगळवारी रात्री मध्यप्रदेशच्या खंडवामध्ये भाषण झाले आहे. ‘स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला’विषयावर भाषण झाल्यानंतर पत्रकारांशी बातचीत करताना पत्रकारांनी इंडोनेशियाच्या चलनावर भगवान गणेशाचे छायाचित्र असल्याकडे स्वामींचे लक्ष वेधले असता, त्यावर उत्तर देताना, “या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदीच देऊ शकतात. माझे यासाठी समर्थन आहे. भगवान गणेश विघ्नहर्ता आहेत. मी तर असे म्हणेन की भारतीय चलनाची स्थिती सुधारण्यासाठी आपल्या नोटांवर देवी लक्ष्मीचे छायाचित्र छापले जावे. कोणालाही याबद्दल वाईट वाटू नये”, असे स्वामी म्हणाले आहेत.