निर्भया प्रकरण : आता दोषींच्या फाशीची अंमलबजावणी अटळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Nirbhaya-case-2.jpg)
दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी चार दोषींपैकी पवन कुमार गुप्ताची दया यचिका फेटाळून लावली. यापूर्वी राष्ट्रपतींनी या प्रकरणातील तिघांची दया याचिका फेटाळली होती. राष्ट्रपतींनी पवनची याचिका फेटाळल्यानंतर दोषींसमोरील सर्व कायदेशीर पर्याय आता संपले आहेत, असे निर्भयाच्या कुटुंबियांच्या वकिलांनी म्हटले आहे.
राष्ट्रपतींच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर निर्भयाच्या कुटुंबियांकडून दोषींच्या फाशीसंदर्भात नव्याने याचिका दाखल करण्यात येणार आहे. निर्भयाच्या कुटुंबियांच्या वकील सीमा कुशवाहा यांनी यासंदर्भातील माहिती दिली. त्या म्हणाल्या की, दोषींकडे असणारे सर्व कायदेशीर पर्याय आता संपले आहेत.
दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा (डेथ वॉरंट) देण्याबाबत दिल्ली न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. यावेळी न्यायालयाकडून जी फाशीची तारीख दिली जाईल, ती अंतिम असेल आणि त्यादिवशी त्यांना फाशी निश्चित होईल, असेही वकील सीमा कुशवाहा यांनी सांगितले.