नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढे कोरोना पॉझिटिव्ह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Tukaram-Mundhe.jpg)
नागपूर – नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्यात कोणतीही लक्षणे नाहीत. नियमानुसार मी स्वत:ला अलगीकरणात ठेवले आहे’, असे तुकाराम मुंढे यांनी ट्विटरवर लिहिले आहे. तसेच त्यांनी मागील १४ दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना आपली कोरोना चाचणी करुन घेण्याची विनंतीही केली आहे. त्याचबरोबर ‘नागपुरातील कोरोना नियंत्रणात येण्यासाठी पुढील काही दिवस मी घरातून काम करेन. आपण नक्की जिंकू’, असा विश्वासही मुंढे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. याच पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत होते. सणांच्या काळात नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे, त्यामुळे कमीत कमी बाहेर पडावे असे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात येत होते. मात्र आता खुद्द आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे नागपुरातील नागरिकांना अधिक सतर्क राहून गर्दी न करता सर्व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.