नांदगाव नगरपालिकेतील सर्व कार्यालयीन कर्मचारी क्वारंटाईन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Qurantine.jpg)
नांदगाव | नाशिकच्या नांदगाव नगरपालिकेतील एका कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील एकाला कोरोना झाल्याने या कर्मचाऱ्यासह पालिका कार्यालयातील मुख्याधिकारी यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन व्हावे लागले आहे.
बाहेरगावी राहत असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या हाताला दुखापत झाल्याने तो रजेवर आपल्या गावी होता. संबंधित कर्मचारी शुक्रवारी कामावर रुजू झाला. यादरम्यान त्याच्या परिवारातील एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्वरित संबंधित कर्मचाऱ्याला क्वारंटाईन होण्यास सांगितले.
हा कर्मचारी पालिकेत येणाऱ्या-जाणाऱ्यांचे ताप व पल्स मोजण्याचे काम करत होता. त्यामुळे त्याचा संबंध कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि नागरिकांशी आला असल्याने नगरपालिकेतील मुख्याधिकारी यांच्यासह २३ कार्यालयीन कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
सुदैवाने पाणीपुरवठा आणि सफाई कर्मचारी हे संबंधिताच्या संपर्कात आलेले नाहीत. दरम्यान आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्यांनाच क्वारंटाईन होण्याची वेळ आल्याने नांदगावकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.