देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,03,05,788 वर
- 24 तासांत 19,078 नवे रुग्ण
नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 1 कोटीच्या पार गेल्याने चिंता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपापली काळजी घेणे आवश्यक आहे. त्यातच देशात मागील 24 तासांत 19,078 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 224 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,03,05,788 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1,49,218 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 22,926 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 99,06,387 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 2,50,183 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉकच्या काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली होती. मात्र आता दिवसेंदिवस दिवसभरातील रुग्णसंख्या घटताना दिसत असली तरी एकूण रुग्णसंख्या 1 कोटीच्या पार गेल्याने चिंता वाढली आहे. तसेच ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूने भारतातही शिरकाव केल्याने सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.





