टोळधाड नियंत्रणासाठी राजस्थानात ड्रोनचा वापर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/images.jpeg)
राजस्थानच्या कृषी विभागाने पिकांवरील टोळधाडीचे नियंत्रण करण्यासाठी ड्रोन विमानांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. जयपूर जिल्ह्य़ात ड्रोनच्या मदतीने कीटकनाशकांची फवारणी टोळधाडीवर करण्यात येत आहे.
कृषी आयुक्त ओम प्रकाश यांनी सांगितले की, आम्ही भाडय़ाने ड्रोन विमान घेतले असून त्याच्या मदतीने कीटकनाशक फवारणी सुरू केली आहे. पुढील काही दिवसात आणखी काही ड्रोन भाडय़ाने घेऊन टोळधाडीचा मुकाबला केला जाईल. ड्रोनच्या मदतीने पर्वतीय प्रदेशातही कीटकनाशकांची फवारणी करता येते. जिथे ट्रॅक्टर किंवा वाहने जाऊ शकत नाहीत तेथे ड्रोन जाऊ शकते. ड्रोनच्या मदतीने अडीच एकर जागेत पंधरा मिनिटात कीटकनाशकाची फवारणी करता येते. ड्रोनच्या शिवाय फवारणी यंत्रे असलेले ८०० ट्रॅक्टर जोधपूर येथे तैनात करण्यात आले आहेत. ५४ वाहने टोळधाडीबाबत धोक्याची सूचना देत आहेत. जयपूर जिल्ह्य़ात चोमू नजीक सामोद येथे ड्रोनच्या मदतीने बुधवारी फवारणी करण्यात आली आहे. टोळधाडीच्या नियंत्रणासाठी अग्निशामक दलही मदत करीत आहे. राजस्थानात निम्म्या जिल्ह्य़ात टोळधाडीचा प्रादुर्भाव झाला असून ११ एप्रिलला पाकिस्तानातून ही टोळधाड आली आहे. हे कीटक वेगाने जयपूर, दौसा, करौली भागात अन्नाच्या शोधात पोहोचले असून सध्या शेतात उभी पिके नाहीत.