जम्मू काश्मीर: चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान
श्रीनगर | महाईन्यूज
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. त्राल येथे दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने रविवारी सकाळी परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केलेली होती. शोधमोहीम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला होता, त्यानंतर लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी ठार झाले आहेत.
शनिवारी जम्मू काश्मीरमध्ये एक डीएसपीच्या कारमधून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आज त्राल येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. दक्षिण काश्मीरमध्ये असलेल्या त्रालमधील गुलशनपोरा परिसरात लष्कराकडून शोधमोहीम सुरू होती. त्यावेळीच ही चकमक झाली होती, त्यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला मोठे यश आले आहे. गेल्या काही काळापासून दहशतवाद्यांनी आपली रणनीती बदलली आहे. आता दहशतवादी दोन किंवा तीनच्या गटांमध्ये हालचाली करतात. यापूर्वी दहशतवादी हे सहा ते सात जणांच्या ग्रुपमधून येत असत.