कोल्हापुरात खासगी रुग्णालयांनी आकारलेले जादा पैसे रुग्णांना परत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Hospital.jpg)
कोल्हापूर – कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांकडून भरमसाठ पैसे उकळून त्यांची लूट करणाऱ्या कोल्हापुरातील खासगी रुग्णालयांना लेखापरीक्षकांनी चांगलाच दणका दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांनी कोरोनाचे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून आकारलेल्या जास्तीच्या बिलाचे १ कोटी ५० लाख परत केले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत गेले. त्यामुळे अनेकांना उपचारासाठी खाटा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळणे अवघड झाले. याचा गैरफायदा घेत काही खासगी रुग्णालयांनी रुग्ण आणि नातेवाईकांची लूट सुरू केली. याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने जिल्ह्यात ५० पेक्षा अधिक लेखापरीक्षकांची नियुक्ती केली. त्यांनी या खासगी रुग्णालयाच्या बिलांची तपासणी करून त्यांना जास्तीचे आकारलेले पैसे परत करण्यास भाग पाडले. अशाप्रकारे कोरोनाचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना या रुग्णालयांनी दीड कोटी परत केले आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.