कोरोना लसीच्या वितरणासाठी आतापासूनच तयारीला लागा; पंतप्रधानांचे राज्यांना आदेश
![Prime Minister Modi on foreign tour after 497 days; Departed for Bangladesh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/modi-pm.jpg)
नवी दिल्ली – भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ९१ लाखांच्या पार गेली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना लसीच्या वितरणाबाबत राज्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. आगामी काळात कोरोना लसीच्या वितरणासाठी प्रत्येक राज्याने आतापासूनच तयारीला लागावे, अशी सूचना पंतप्रधानांनी केली. ‘कोरोना लसीच्या वितरणात राज्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण लसीचे वितरण राज्यांतील यंत्रणेच्या माध्यमातूनच पार पडणार आहे. या कामात राज्यांचा अनुभव कामी येणार आहे. त्यासाठी राज्यांनी कोरोना लसीच्या वितरणासाठी आतापासूनच पुढाकार घेऊन काम करायला पाहिजे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच ‘कोरोनाबाबत सतर्क राहा. हयगय करू नका’, असे आवाहनही त्यांनी केले.
नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आपल्यासाठी कोरोना लसीच्या वेगवान वितरणाबरोबरच लोकांचा जीव वाचवणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे लस 100 टक्के सुरक्षित आहे, हे शास्त्रज्ञांनी सांगितल्यानंतर ती भारतीयांना देण्यात येईल. राज्यांच्या सहकार्याने कोरोना लसीचे वितरण केले जाईल. त्यामुळे राज्यांनी कोल्ड स्टोरेजच्या सुविधा उभारण्यासाठी कामाला लागावे. तसेच कोरोनाची लस येणार असली तरी नागरिकांनी कोरोनाच्या लढाईत कोणतीही ढिलाई बाळगू नये’, असेही मोदींनी सांगितले.
त्याचबरोबर ‘कोरोना लसीवर अनेक पातळीवर संशोधन सुरू आहे. काही लस अंतिम टप्प्यात आहे. मात्र लस कधी येणार हे सांगता येत नाही. ते सर्व संशोधकांच्या हातात आहे पण त्यावरून कुणीही राजकारण करू नये’, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला.