कोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Corona-Vaccine.jpg)
| कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. या कोरोना विषाणूवर लस शोधण्यासाठी जगातील अनेक देश प्रयत्नशील आहेत. त्याच दरम्यान रशियाने एक आनंदाची बातमी दिली आहे. काही देशांनी कोरोनावर यशस्वी लस बनवल्याचा दावा केला असन त्यामध्ये रशिया एक आहे. कोरोनावरील लसीच्या सर्वच चाचण्या करण्यात आल्या असून त्या यशस्वी झाल्याचा दावा रशियाने केला आहे. रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराशको म्हणाले की, कोरोनावरील लसीची चाचणी यशस्वीपणे झाली आहे. तर रशियाचे उप आरोग्यमंत्री ओलेग ग्रिदनेव म्हणाले, रशिया १२ ऑगस्ट रोजी जगातील पहिली कोरोनावरील लसीची नोंदणी करणार आहे.
सर्व काही सुरळीत सुरू राहिलं तर ऑक्टोबर महिन्यापासून रशियामध्ये लसीकरणाचे काम देखील सुरू होईल असंही रशियाचे उप आरोग्यमंत्री ओलेग ग्रिदनेव म्हणाले आहेत.
चाचण्या १००% यशस्वी झाल्याचा दावा
रशियाने सांगितले की, कोरोना विषाणूवरील लसीची रशियात चाचण्या करण्यात आल्या आहेत. क्लिनिकल चाचण्या १००% यशस्वी झाल्या आहेत. रशियन संरक्षण मंत्रालय आणि गमलेया नॅशनल सेंटर फॉर रिसर्च यांनी ही लस तयार केली आहे. क्लिनिकल ट्रायलमध्ये ज्यांच्यावर लसीची चाचणी करण्या आली त्या सर्वांमध्ये SARS-CoV-2 ची रोग प्रतिकारकशक्ती असल्याचं समोर आलं आहे.
४२ दिवसांपूर्वी लसीच्या प्रयोगाला सुरूवात
रशियामध्ये कोरोनावरील लसीच्या प्रयोगाला ४२ दिवसांपूर्वी सुरूवात झाली. त्यावेळी मॉस्कोमधील बुरदेंको सैन्य रुग्णालयातील स्वयंसेवकांना (वैज्ञानिक संशोधकांना) कोरोना लस देण्यात आली. ही लस टोचल्यानंतर डॉक्टरांना लक्षात आले की, या सर्वांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता मोठ्या प्रमाणात तयार झाली आहे. या चाचणीनंतर रशियन सरकारने लसीचं कौतुक केलं आहे.
ऑक्टोबरपासून लसीकरणाची रशियाची योजना
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचं म्हणणे आहे की, ही लस दिल्यानंतर असे दिसून आले की, या लसीमुळे लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढली आहे. लस दिलेल्या कोणत्याही स्वयंसेवकावर लसीचा दुष्परिणाम किंवा अस्वस्थता दिसून आलेली नाहीये. ही लस मोठ्या प्रमाणात नागरिकांवर उपचारासाठी वापरण्यापूर्वी रशिया सरकारकडून मान्यता घेण्यात येत आहे. रशियाने दावा केला आहे की, कोरोना व्हायरस विरुद्ध सुरू असलेल्या जागतिक लढाईत कोविड-१९ वर लस शोधण्यात रशिया इतर देशांपेक्षा पुढे आहे. असे म्हटलं जात आहे की, क्लिनिकल चाचण्यांच्या यशानंतर रशिया आता लसीच्या प्रभावी परिणामकारकतेची चाचणी घेण्यासाठी तीन सर्वसमावेशक चाचण्या घेणार आहे.