राज्यात सलग दुसऱ्या दिवशी १० हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात
मुंबई – महाराष्ट्र राज्यात सलग दुसऱ्या दिवशी १० हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. काल सोमवारी दिवसभरात राज्यातील विविध रुग्णालयांतून १० हजार २२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यासह राज्यात आतापर्यंत २ लाख ८७ हजार ३० रुग्ण कोरोनाची लढाई जिंकून घरी परतले असून राज्यातील रिकव्हरी रेट एक टक्क्याने वाढून ६३. ७६ टक्के इतका झाला आहे.
कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडलेल्या महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. सलग दुसऱ्या दिवशी रुग्ण बरे होण्याचा आकडा वाढला आहे. काल नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा अधिक आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचं चित्र आहे. सोमवारी राज्यात ८ हजार ९८६ नवीन रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या ४ लाख ५० हजार १९६पर्यंत पोहोचली आहे. तर राज्यात ९ लाख ४० हजार ४८६ लोक होम क्वारंटाईन असून ३७ हजार ९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.




