केरळमध्ये झालेल्या गर्भवती हत्तीणीच्या क्रूर हत्येवर रतन टाटांची भावनिक प्रतिक्रिया
केरळमध्ये झालेल्या गर्भवती हत्तीणीच्या क्रूर हत्येची बातमी समोर आल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अनेकांनी या घटनेची निंदा केली आहे तर अनेकांनी या घटनेवर हळहळ व्यक्त केलीय. प्रसिद्ध व्यावसायिक रतन टाटा यांनीही या घटनेचा निषेद करत या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली आहे. त्यांनी एक ट्विट करून हत्तीणीचा मृत्यू हा क्रूर हत्या असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केलीय.
‘काही लोकांनी गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला दिल्यानं या हत्तीणीचा मृत्यू झाला. ही बातमी समजल्यानंतर मला मोठा धक्का बसलाय. एखाद्या निष्पाण मुक्या प्राण्याच्या हत्येचा गुन्हा हा एखाद्या मनुष्यवधाच्या गुन्ह्यापेक्षा कमी नाही. या प्रकरणात न्याय मिळायलाच हवा’ अशी मागणी रतन टाटा यांनी सोशल मीडियाद्वारे केलीय.
केरळमधील मलप्पुरम इथं भुकेनं व्याकूळ झालेली गर्भवती हत्तीण जंगलाची हद्द सोडून माणसांत आली. एका व्यक्तीनं खाण्यासाठी पुढे केलेला अननस हत्तीणीने मोठ्या विश्वासाने तोंडात टाकलं. पण ‘मानव’रुपी त्या श्वापदाने अननसात फटाके भरले होते. हत्तीणीच्या तोंडात हे फटाके फुटले. यामुळे हत्तीण गंभीर झाली होती. गर्भवती असलेल्या हत्तीणीला यानंतर काहीही खाता आलं नाही. भुकेनं आणि असह्य वेदनांनी ती व्याकूळ झाली. दाह शमवण्यासाठी हत्तीण नदीच्या पाण्यात तोंड बुडवून ती उभी राहिली आणि अखेर तिने तिथेच जलसमाधी घेऊन पोटातल्या पिल्लासह प्राण सोडला.
केरळमधील मलप्पूरम जिल्ह्याच्या ‘सायलेंट व्हॅली’मध्ये २७ मे रोजी घडली होती. ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’चे सदस्य असलेल्या मोहन कृष्णन नावाच्या वनाधिकाऱ्याने फेसबुकवर लिहिलेल्या भावनिक पोस्टद्वारे ही घटना जगासमोर आली. ‘हत्तीणीला स्वत: साठी नव्हे, तर पोटातील बाळासाठीही त्रास झाला असावा. ती पुढच्या १८ ते २० महिन्यांत जन्म देणार होती’ असंही कृष्णन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील पठाणपूरमच्या जंगलातही जवळपास महिनाभरापूर्वी अशीच घटना घडली होती. या घटनेतही एका तरुण हत्तीणीचा जबड्यातील जखमांमुळे मृत्यू झाला. आता या दोन्ही घटनांचा तपास सुरू करण्यात आला आहे. हत्तींचा कळप एका दिवसांत कित्येक किमी प्रवास करतात. त्यामुळे ही घटना नेमकी कुठे घडली, याचा तपास करणे कठीण असते, असे वनाधिकाऱ्यांनी सांगितले