‘केजरीवालांच्या तोडीस तोड उमेदवार देण्यास आम्ही कमी पडलो’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Sudhir-Mungantiwar.jpg)
मुंबई | ‘दिल्लीत भाजपच्या जागा वाढल्या पण अपेक्षित यश मिळाले नाही. अरविंद केजरीवालांच्या तोडीस तोड उमेदवार देण्यास आम्ही कमी पडलो असल्याची प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवावरुन सर्वच राजकिय पक्ष भाजपवर टीका करत आहे. यावर माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
जर भाजपने केजरीवालांच्या तोडीस तोड उमेदवार उभा केला असता तर आज दिल्लीत वेगळे चित्र असते, असे त्यांनी सांगितले. सुधीर मुनगंटीवार पुढे असे सांगितले की, ‘दिल्लीत सत्ता स्थापन करण्याइतपत भाजपला यश मिळाले नाही. मात्र ३ जागांवरुन भाजप १८ ते २० जागांवर म्हणजेच ६ पट पुढे गेली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्यास आम्ही कुठेतरी कमी पडलो असू शकतो, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
दिल्लीमध्ये मतांचे स्पष्ट ध्रुवीकरण झाले असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसंच, भाजपाला दिल्लीत नाकारले असते तर १८ ते २० जागा आल्याच नसत्या, असे सांगत त्यांनी शिवसेनेचे नेते अनिल परब यांना उत्तर दिले.