कॅबीनेटमध्ये 100 कोटी मंजूर मात्र तीर्थक्षेत्र म्हणूनच ; समितीलाही मुख्यमंत्र्यांकडून नकार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/sai_baba-shamadhi-Frame-copy.jpg)
परभणी | साईबाबांची पाथरी ही जन्मभूमी असल्याच्या वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणीचे शिवसेना खा. संजय जाधव व काँग्रेसचे आ. सूरेश वरपूडकर यांना बुधवारच्या (दि.22) मंत्रीमंडळाच्या बैठकीत 100 कोटी रूपये तीर्थक्षेत्र विकास म्हणून पाथरीसाठी मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती देत आधी विकास कामे करून घ्या, असा सल्ला दिला. जन्मभूमीसाठी शासकीय समिती गठीत करण्यावर मात्र त्यांनी नकार दर्शविला. परिणामी, जन्मभूमीच्या भूमिकेवर ठाम राहिलेल्या पाथरीकरांचे दबावतंत्र सरकारदरबारी कमी पडल्याचे दिसून येत आहे.
पाथरी हीच साईबाबांची जन्मभूमी असल्याच्या भूमिकेवर ठाम राहत मंगळवारी झालेल्या ग्रामसभेत जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते मंडळींनी या प्रश्नावरील आपला लढा कायमच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. शासनाला पुरावे देऊन समिती गठीत करण्याची मागणी करण्याचा ठरावही घेण्यात आला होता. त्याप्रमाणे सर्वपक्षीय खासदार – आमदारांचे शिष्टमंडळ मंगळवारी रात्रीच मुंबईस रवाना होणार होते. मात्र खा. संजय जाधव व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सूरेश वरपुडकर हे दोघेच बुधवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. या दोघांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन जन्मभूमीच्या प्रश्नावर समिती गठीत करण्याची मागणी केली. साईबाबांची पाथरी हीच जन्मभूमी असल्याबाबतचे सर्व पुरावेही या दोघा लोकप्रतिनिधींनी त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. परंतू, ठाकरे यांनी आजच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत पाथरीला 100 कोटी रुपये देण्याचा निर्णय पारित झाल्याचे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी या 100 कोटी रुपयांच्या निधीतून साईबाबा मंदिराच्या परिसरातील विकास कामे पूर्ण करावीत. निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल, असेही स्पष्ट केले. मात्र जन्मभूमीच्या प्रश्नावर समिती गठीत करण्यावर ठाकरेंनी काहीही स्पष्ट केले नाही. सध्या समिती वगैरे नको, आधी विकास करा, पूढे बघू, असा सल्लाच मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिला. 100 कोटींचा हा निधी तीर्थक्षेत्र विकास या शिर्षकाखालीच देण्यात आला आहे. यामुळे पाथरीसह जिल्हावासीयांनी मंगळवारी ग्रामसभेतून घेतलेल्या जन्मभूमीच्या ठरावाला मुख्यमंत्री ठाकरे यांनी बगलच दिल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व साईभक्त काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.