कांदा निर्यातीवर घातलेली बंदी केंद्र सरकार हटवणार…
कांदा निर्यातीवर घातलेली बंदी हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांसह सर्व सामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे. निर्यातीवरील बंदी हटवल्यामुळे कांद्याचे भाव कमी होण्यास मदत होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.
केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे. कांद्याच्या किंमती स्थिर झाल्या असून उत्पन्नही चांगले झाले आहे. मागील वर्षीच्या मार्चमध्ये २८.४ लाख टन उत्पादनाच्या तुलनेत आगामी मार्चमध्ये ४० लाख टन कांदा उत्पन्न होण्याची शक्यता आहे, असा उल्लेख त्यांनी ट्विटमध्ये केलाय. परदेशी व्यापार महासंचालनालयाला (डीजीएफटी) अधिसूचना जारी केल्यानंतर हा निर्णय लागू होईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली.
सप्टेंबर २०१९ मध्ये सरकारने कांद्या निर्यातीवर बंदी घातली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याच्या किंमती वाढल्या होत्या. सरकारने घेतलेल्या या निर्णायवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार आगामी मार्चमध्ये कांद्याचे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत वाढण्याचा अंदाज आहे. जवळपास ४०. ६८ लाख टन इतके उत्पन्न अपेक्षित आहे. यावरुनच केंद्राने निर्यातीवरील बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे.