काँग्रेसच्या आमदारांना भेटायला गेलेले दिग्विजय सिंह पोलिसांच्या ताब्यात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-243.png)
बंगळुरूमधील हॉटेलमध्ये असलेल्या मध्य प्रदेशमधील काही काँग्रेसच्या आमदारांना भेटायला गेलेले काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना बुधवारी सकाळी कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले. बुधवारी पहाटे लवकर बंगळुरूमधील रामदा हॉटेलबाहेर दिग्विजय सिंह आणि काँग्रेसचे इतर कार्यकर्ते धरणे धरून बसले होते. काँग्रेसच्या आमदारांना आम्हाला भेटायचे आहे. आम्हाला हॉटेलमध्ये जाऊ द्या, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात होती. पण दिग्विजय सिंह आणि इतरांना घटनास्थळावरून पोलिस हटवत असल्याचा व्हिडिओ पुढे आला आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Capture-26.jpg)
दिग्विजय सिंह म्हणाले, मी मध्य प्रदेशमधून राज्यसभा निवडणुकीसाठी उभा असलेला उमेदवार आहे. येत्या २६ मार्चला निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. आमच्या पक्षाच्या आमदारांना हॉटेलमध्ये डांबून ठेवले आहे. त्यांना माझ्याशी बोलायचे आहे. त्याचे मोबाईल काढून घेण्यात आले आहेत. पोलिस मला त्यांच्याशी बोलू देत नाहीत. या आमदारांच्या जीवाला धोका असल्याचे सांगत मला हॉटेलमध्ये सोडत नाहीत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/123-7.jpg)
हॉटेलमध्ये डांबून ठेवलेल्या आमदारांच्या कुटुंबियांचा मला फोन येतो आहे, असेही दिग्विजयसिंह म्हणाले. या हॉटेलमधील ज्या खोलीमध्ये आमदार आहेत. तिथेच प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा कडक पहारा आहे. आमदारांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे, असाही आरोप त्यांनी केला.