आसामचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरुण गोगोई अतिदक्षता विभागात दाखल
गुवाहाटी – आसामचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरुण गोगोई यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्यांची प्रकृती काल गुरुवारी अचानक जास्त बिघडली. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
तरुण गोगोई यांना २६ ऑगस्ट रोजी गुवाहाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर उपचारानंतर काही दिवसांनी त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतरही गुवाहाटीच्या सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तरुण गोगोई यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून डॉक्टरांची एक विशेष टीम नियुक्त करण्यात आली आहे. या टीमच्या निगराणीखाली गोगोई यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रिपुन बोरा यांनी गुवाहाटी रुग्णालयात जाऊन गोगोई यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
तरुण गोगोई आसाम राज्याचे २००१ ते २०१६ असे सलग १६ वर्ष मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांना २६ ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी त्यांच्या शरीरातील ऑक्सिनची पातळी घसरली होती. त्यानंतर ऑक्सिजनची पातळी सुधारली. गेल्या आठवड्यात त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता.