आयकर विभागाकडून आलेल्या ई-मेलकडे दुर्लक्ष करू नका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/incometax-bhavan.jpg)
नवी दिल्ली – कोरोना संकटकाळात करदात्यांना प्रत्येक महत्त्वाचा मेसेज मिळावा यासाठी आयकर विभागाने वेळीवेळी ई-मेलद्वारे सूचना केल्या. मात्र अनेक करदाते मेले चेक करत नसल्याने त्यांच्यापुढे अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने एक ट्वीट करून आम्ही पाठवलेल्या कोणत्याही ई-मेलकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन करदात्यांना केले आहे. आम्ही पाठवलेला प्रत्येक ई-मेल महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले असता तुम्हाला नुकसान होऊ शकते, असे आयकर विभागाने ट्वीटद्वारे म्हटले आहे.
दरम्यान, आयकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 40 लाखांहून अधिक करदात्यांना 1.36 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे. यासंबंधी विभागाने एक ट्विट केले आहे. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) 1 एप्रिल 2020 ते 17 नोव्हेंबर 2020 पर्यंत 40.19 लाख करदात्यांना 1,36,066 कोटींचा परतावा दिला आहे. यामध्ये 38,23,304 प्रकरणांमध्ये 35,750 कोटी रुपयांचा वैयक्तिक आयकर परतावा दिला गेला. इतकंच नाही तर 1,95,518 प्रकरणांमध्ये 1,00,316 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर परतावाही देण्यात आला आहे.