अरबी समुद्रामध्ये पुढील 12 तासात कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता अधिक वाढून चक्रीवादळ येण्याची शक्यता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/1.png)
महाराष्ट्र आणि गुजरात राज्यावर असलेलं ‘निसर्ग चक्रीवादळा’चं संकट आता अधिकच प्रबळ होत चाललेलं दिसून येत आहे. भारत सरकारने जारी केलेल्या हवामान अंदाजपत्रामध्ये अरबी समुद्रामध्ये पुढील 12 तासामध्ये कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता अधिक वाढून चक्रीवादळ अधिक मजबूत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान हे चक्रीवादळ उद्या म्हणजे 3 जूनला महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवरून पुढे सरकेल. असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात हे वादळ रायगड जवळील हरिहरेश्वरच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात मुंबईसह इतर भागात पावसाचा रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
![](https://assets-news-bcdn.dailyhunt.in/fetchdata16/images/c3/df/17/c3df17cc9a045bdd0b6c0adf43f76d92f2aaf5369223dbd23b07ffa435cd170e.png)
IMD ने जारी केलेल्या पत्रकानुसार आज पहाटे 2.30 च्या माहितीनुसार अरबी समुद्रामध्ये पणजीपासून वेस्ट- साऊथ वेस्ट भागात 300 किमी, मुंबईपासून 550 किमी साऊथ साऊथ वेस्ट आणि सुरत पासून 770 साऊथ साऊथ वेस्ट दिशेला हे वादळ आहे.
निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये धडकण्याचा अंदाज असला तरीही मुंबई, केरळ, कर्नाटक, गोवा या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम किनारपट्टी लगत असणार्या मच्छिमारांना समुद्रामध्ये न जाण्याचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रामध्ये गेलेल्या बोटी देखील माघारी बोलावण्याचं काम एनडीआरएफकडून करण्यात आलं आहे.