अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना आक्रमक, संसदेबाहेर आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/Shivsena-Agitation-New-Delhi.jpg)
नवी दिल्ली | एनडीएने बाहेरचा रस्ता दाखवत विरोधी बाकांवर व्यवस्था केल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना खासदारांनी संसदेबाहेर आंदोलन केलं. ‘अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या महाराष्ट्र राज्याला तातडीने नुकसानभरपाई जाहीर करा, पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी बांधवांना आधार द्या’ अशा मागण्या करणारे फलक हाती धरत शिवसेना खासदारांनी निदर्शनं केली.
संजय राऊत, विनायक राऊत, श्रीकांत शिंदे, अरविंद सावंत हे शिवसेनेचे दोन्ही सभागृहातील खासदार आंदोलनात सहभागी होते. त्यानंतर शिवसेनेने लोकसभेतून सभात्याग केला. गेल्या काही दिवसांपासून धुमसत असलेला शिवसेनेचा राग मुंबई आणि दिल्लीतील आंदोलनातून बाहेर पडला.
दुसरीकडे, मुंबईतही शिवसेनेने मेट्रो 3 विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेने गिरगावात मेट्रोविरोधात सुरु केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी वाहनांवर दगडफेक केली. या दगडफेकीत वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. मुंबई मेट्रोसाठी केल्या जाणाऱ्या खोदकामामुळे इमारतींना तडे जात असल्याचा आरोप आहे.
मेट्रोच्या कामांमुळे डंपर 24 तास सुरु आहेत. भयंकर ट्रॅफिक जॅम होतं. डंपरमुळे अपघात होतात. आवाज आणि गोंगाटामुळे जगणं मुश्किल झालं आहे, असं आंदोलकांचं म्हणणं आहे. जोपर्यंत डंपर बंद होत नाहीत, जोपर्यंत लिखित आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहील, असा इशारा शिवसेना नेते पांडुरंग सपकाळ यांनी दिला.