अग्नितांडव : दिल्लीतील घटनेची न्यायालयीन चौकशी; मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/kejariwal-public-frame-copy.jpg)
महाईन्यूज |दिल्ली
राजधानी दिल्ली सकाळी लागलेल्या आगीच्या घटनेनं जबरदस्त हादरली. धान्य बाजार परिसरात झालेल्या अग्नितांडवात तब्बल ४३ निष्पाप लोकांना प्राण गमवावा लागला आहे. तर अनेक जण आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यानं होरपळले आहेत. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, “या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले असून, मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाख रूपयांची मदत देणार आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
घटनेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर केजरीवाल यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, “ही घटना वेदनादायी आहे. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश आपण दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाखांची नुकसान भरपाई देण्यात येईल, तर जखमींना एक लाख रूपये भरपाई देण्यात येईल. त्याचबरोबर जखमींवरील उपचाराचा खर्च राज्य सरकार देईल,” अशी माहिती आपचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिली.