मुंबईमध्ये झालेल्या 1992-93 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा कारागृहातच मृत्यू

मुंबईमध्ये झालेल्या १९९२-९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि कुविख्यात गुंड टायगर मेमनचा भाऊ युसूफ मेमनचा नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आज सकाळी मृत्यू झाला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असलेला युसूफ मेमन आज सकाळी १०.३० वाजता याच प्रकरणातील दुसरा आरोपी आणि त्याचा भाऊ इसाक सोबत बाथरूम परिसरात ब्रश करत होता. यावेळी युसूफ अचानक कोसळला. त्यामुळे त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
त्याचा मृतदेह धुळ्याला शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. युसूफ मेमन हा या हल्ल्यातील प्रमुख आरोपी टायगर मेमनचा भाऊ होता. कुख्यात दहशतवादी टायगर मेमन अद्याप फरार आहे तर त्याचा एक भाऊ याकूब मेमन यास 2015 मध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली आहे. . त्याचा दुसरा भाऊ इसाक मेमन हा देखील नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. हे दोघेही २०१८पासून या कारागृहात शिक्षा भोगत आहे. युसूफवर बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आणि कटात सहभाग घेतल्याचा आरोप आहे. बॉम्बस्फोटाचा कट रचण्यासाठी आपला फ्लॅट दिल्याचा या दोघांवरही आरोप होता.