मीरा-भाईंदरमध्ये मोर्चाआधीच आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड; मनसेचे कार्यकर्ते आक्रमक

मुंबई | मराठी भाषेच्या आणि मराठी माणसाच्या हक्कांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आज मीरा-भाईंदरमध्ये भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. मीरा-भाईंदर शहरातील विविध भागातून मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होणार होते. परंतू पोलिसांनी परवानगी न दिल्याने आणि अविनाश जाधव यांच्या अटकेनंतर आता मनसे कार्यकर्त्यांनी मीरा रोड परिसरात राडा घातल्याचं पहायला मिळालं.
अविनाश जाधव यांना पहाटे साडेतीन वाजता अटक केल्यानंतर आता मनसेने ट्विट करत सरकारला धारेवर धरलं. मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा आयोजित केलेला असताना, पहाटे पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाईच्या नावाखाली पक्षाचे नेते अविनाश जाधव यांना अटक केली. सरकार मराठीच्या मुद्द्यावर निघणाऱ्या मोर्च्याला इतकी का घाबरत आहे? का हे लांगुलचालन आहे? असा सवाल मनसेने ट्विट करत विचारला आहे.
हेही वाचा : प्रारुप विकास आराखडा: भूमिपुत्रांसह पिंपरी-चिंचवडकरांवर अन्याय होणार नाही!
तसेच महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मोर्च्याला परवानगी नाही. हे सरकार महाराष्ट्राचं आहे का गुजरातचं? आमच्या नेत्यांना अटक करून मोर्चा थांबेल आणि विषय मागे पडेल असं सरकारला वाटत असेल तर त्यांनी त्या भ्रमात राहू नये. मराठी माणूसच आता या मोर्च्याचे नेतृत्व करेल, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.





