breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

खेलो इंडिया युथ गेम्स : महाराष्ट्र-हरयाणामध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई!

महाराष्ट्राचा संभाव्य विजेतेपदाचा दावेदार

चेन्नई | हर्षल देशपांडे

खेलो इंडिया युथ गेम्सच्या (१८ वर्षांखालील) सहाव्या पर्वाचा शुभारंभ झाला अन् गतविजेते महाराष्ट्र व हरयाणा या दोन तुल्यबल संघांमध्ये पुन्हा एकदा वर्चस्वाची लढाई सुरू झाली. आतापर्यंत झालेल्या पाच स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने तीन वेळा, तर हरयाणाने दोन वेळा या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले आहे. यावेळीही महाराष्ट्राकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात आहे. मात्र, कबड्डीमध्ये हरयाणाच्या मुलींनी शुक्रवारी महाराष्ट्राला पराभवाचा धक्का देत आपले इरादे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत महाराष्ट्र-हरयाणा यांच्यात कोण बाजी मारणार याकडे तमाम क्रीडाप्रेमींच्या नजरा असतील.

गतवेळी मध्य प्रदेशात झालेल्या २०२२च्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राने ५६ सुवर्ण, ५५ रौप्य व ५० कांस्य अशी एकूण सर्वाधिक १६१ पदकांची लयलूट करीत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले होते. हरयाणाला ४१ सुवर्ण, ३२ रौप्य व ५५ कांस्य अशा एकूण १२८ पदकांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते, तर यजमान मध्य प्रदेशने तिसरे स्थान पटकाविले होते. खेलो इंडियाच्या यंदाच्या सहाव्या स्पर्धेतही महाराष्ट्र व हरयाणा या दोन संघांचाच दबदबा बघायला मिळणार आहे.

यजमान तमिळनाडूचा संघही घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा उठवित पदकतक्त्यात टॉप-३मध्ये राहण्याचा प्रयत्न करतील. स्पर्धेतील २६ खेळांपैकी महाराष्ट्राने २४ खेळांसाठी आपला ४१५ खेळाडूंचा बलाढ्य संघ मैदानात उतरवला आहे. हरयाणाचा ४९१, तर यजमान तमिळनाडूचा सर्वाधिक ५५९ खेळाडूंचा संघ यंदाच्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये कौशल्य पणाला लावणार आहेत.

हेही वाचा    –    बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध होणार

चार शहरांतील १२ ठिकाणी रंगणार स्पर्धा…

तमिळनाडूतील चेन्नई, मदुराई, त्रिची व कोईमतूर या चार शहरांमधील १२ ठिकाणी यंदाची खेलो इंडिया यूथ गेम्स आयोजित करण्यात आलेली आहे. स्पर्धेतील एकूण २६ खेळांमध्ये देशभरातील विविध राज्यांतील ५६०० हून अधिक खेळाडू एकूण २७८ सुवर्ण, २७८ रौप्य व ३७७ कांस्य असे एकूण ९३३ पदकांसाठी झुंजणार आहेत.

जलतरण, अ‍ॅथलेटिक्समध्ये सर्वाधिक पदके..

खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये जलतरणात सर्वाधिक ३८, तर अ‍ॅथलेटिक्समध्ये ३२ सुवर्णपदकांसाठी निकराची झुंज बघायला मिळणार आहे. त्याखालोखाल कुस्ती (२१) बॉक्सिंग (२०), वेटलिफ्टिंग (२०), जिमनॅस्टिक्स (१७), सायकलिंग (१६), नेमबाजी (१६) आणि तलवारबाजी (१२) या खेळांमध्ये सर्वाधिक पदके आहेत.

महाराष्ट्राचा संघ यंदाच्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये केवळ जेतेपद राखण्याच्या इराद्यानेच मैदानावर उतरणार नाही, तर गतवेळीपेक्षा अधिक पदकांची कमाई करण्याचाही आमचा निर्धार आहे. मनासारखा सराव झालेला असल्याने महाराष्ट्राचे खेळाडू मोठ्या आत्मविश्वासाने या स्पर्धेत खेळतील. याचा नक्कीच आम्हाला फायदा होणार आहे.

विजय संतान, पथक प्रमुख, महाराष्ट्र संघ.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button