breaking-newsTOP Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

जितेंद्र आव्हाड आणि वाद… काय आहे राजकारण…

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यातील आक्रमक नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे ‘हर हर महादेव’ चित्रपटास केलेला विरोध आणि त्यानंतर रंगलेल्या अटक नाट्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे ‘ब्लू आईड बाॅय’ अशी ओळख मिरविणारे आव्हाड हे या पक्षातील बहुजनवादी आणि त्यातही अल्पसंख्याकवादी राजकारणाचा आग्रह धरणाऱ्या नेत्यांपैकी एक मानले जातात. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आव्हाड त्यांच्या विरोधकांसाठी कळव्यापेक्षा ‘मुंब्र्याचे’ प्रतिनिधित्व करणारे ठरतात ते यामुळेच. आव्हाड आणि वाद हे समीकरण काही आताचे नाही. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यापासून थेट ‘हर हर महादेव’ चित्रपटातील मूळ संहितेवर आक्षेप घेताना महाराष्ट्रातील एका ठराविक वैचारिक परंपरेचा आग्रह धरणाऱ्यांमध्ये आपण अग्रणी आहोत हे ठसविण्याचा आव्हाड यांचा पुरेपूर प्रयत्न राहिला आहे आणि त्यामुळेच ते अनेकदा वादग्रस्तही ठरले आहेत. शनिवारी दुपारी जामीन मिळताच आव्हाड यांनी केलेले ‘चाणाक्य नीती फसली’ हे ट्वीटदेखील त्यांच्या राजकीय स्वभावाला साजेसे ठरले ते यामुळेच.

आंदोलनातून वाद हे समीकरण नेमके कसे?
समाजमाध्यमांवर सातत्याने सक्रिय असलेल्या राज्यातील ठराविक राजकीय नेत्यांपैकी आव्हाड एक मानले जातात. राजकारणातील हा ट्रेंड आपलासा करणाऱ्या राज्यातील बिगर भाजपाई नेत्यांमध्ये आव्हाड यांचे नाव अग्रणी राहिले. शहर, राज्य, देश आणि अगदी जगातील कोणत्याही घडामोडींविषयी तातडीने व्यक्त होणे आणि समाजमाध्यमी भूमिका घेण्यात आव्हाड नेहमीच अग्रभागी राहिले आणि त्यामुळे वादात, चर्चेतही राहिले.

वादांची पार्श्वभूमी जुनीच…
समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या अनंत करमुसे यांना मारहाण केल्यामुळे आव्हाड यांच्यावर मध्यंतरी पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. आता पुन्हा ‘हर हर महादेव’ चित्रपटाविरोधात केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली आहे. त्यामुळे अशा कारवाईनंतरही आपल्या भूमिकांवर ठाम राहणारे आव्हाड आणि वादाचे प्रसंग हे समीकरण आजचे नव्हे तर जुनेच असल्याचे दिसून येते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या पुस्तकावर आक्षेप घेऊन आव्हाड चर्चेत आले. पुरंदरे यांनी लिहीलेला इतिहास चुकीचा आहे आणि तो ब्राह्मण्यवादाकडे झुकणारा आहे असा आक्षेप घेत त्याच भूमिकेवर वर्षानुवर्षे ठाम राहणाऱ्या ठराविक राजकीय नेत्यांमध्ये आव्हाड यांचा समावेश होतो. आपली ही भूमिका ठसविण्यासाठी या विचारांना पाठबळ देणाऱ्या लेखक, कायकर्ते, विचारवंतांची भाषणे, संमेलने आयोजित करून चर्चेत राहिलेल्या आव्हाडांनी नेहमीच वादाला आपलेसे केल्याचे दिसून येते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला टोकाचा विरोध हेदेखील आव्हाड यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य ठरले. त्यामुळे ठाण्यासारख्या शहरामध्ये काही ठराविक भागांपुरतेच त्यांचे राजकारण मर्यादित राहिल्याचे पहायला मिळते.

मंत्री झाल्यानंतरही वादाचे प्रसंग कायम कसे राहिले?
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आव्हाड यांच्याकडे मंत्रिपद आले तरीही ते इतर कारणांमुळे सतत वादात राहिले. आव्हाड यांचे आक्षेपार्ह छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी अनंत करमुसे यांना त्यांच्या बंगल्यावर नेऊन मारहाण करण्यात आल्याचे प्रकरण गाजले. पोलीस अंगरक्षकांच्या उपस्थितीत आव्हाड यांच्या समक्ष आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करमुसे यांनी केला आणि हे प्रकरण लावूनही धरले. मंत्रीपदाच्या काळातच या प्रकरणी आव्हाड यांना अटक झाली.

गर्दीच्या वेळेत सर्वसामान्य लोकलच्या फेऱ्याऐवजी वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवल्या जातात याविरुद्ध आव्हाड आक्रमक राहिले. मंत्रीपदाच्या काळातच रेल्वे रुळांलगतच्या बांधकामधारकांवर कारवाई होऊ नये यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे आग्रह धरला. ओबीसी आरक्षण ते संविधान वाचविण्यासाठी आंदोलन, राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टिप्पणी करणाऱ्या केतकी चितळे हिच्यावर टीका आदि अनेक वादांमध्ये ते सक्रिय राहिले. ठाणे शहरात समूह पुनर्विकास योजना लागू करावी यासाठी राज्यात सत्तेत असतानाही त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते.

ऐतिहासिक वाद आणि आव्हाड हे समीकरण ?
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा, खोटा इतिहास मांडण्याची परंपरा बाबासाहेब पुरंदरे यांनी सुरू केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. पुरंदरे यांच्या जाणता राजा या महानाट्यालाही आव्हाड यांनी विरोध केला. पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या पुस्तकावर आव्हाड यांचा आजही आक्षेप कायम असल्याचे दिसून येते. ‘हर हर महादेव’ या सिनेमालाही आव्हाड यांचा हाच आक्षेप आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेवर दाखविल्या गेलेल्या प्रसंगांनाही आव्हाड यांनी विरोध केला आहे. या चित्रपटाचा व्हिव्हियाना मॉलमधील सिनेमागृहात सुरू असलेला खेळ आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला. या आंदोलनादरम्यान एका प्रेक्षकाला कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याने ते वादात सापडले. त्यांना जामीन मिळालेला असला, तरी संघर्षात्मक, आव्हानात्मक भूमिका ते यापुढेही घेत राहतील हे नक्की.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button