breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

फक्त १२ आमदारांसाठी राज्यपालांना भेटणे हे राज्याचे दुर्भाग्य- सुधीर मुनगंटीवार

मुंबई |

राज्यात करोना, मंदिर उघडण्यास परवानगी द्यावी अशा मुद्यांवरून अगोदरच भाजपाकडून ठाकरे सरकारवर टीका केली जात असताना, आता यामध्ये आणखी एका जुन्याच मुद्द्याची नव्याने भर पडल्याचे दिसत आहे. तो म्हणजे विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या नियुक्तीचा मुद्दा. कारण, यासाठी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली व याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची देखील उपस्थिती होती. यावरून आता पुन्हा एकदा भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या भेटीवरून टिप्पणी केली आहे.

“दोन दिवसांचं अधिवेशन होतं. कधी सुरू होतं आणि कधी संपतं, असं स्वप्नात असल्यासारखं अधिवेशन संपत आहे. कारण कोरना विषाणूने सांगितलेलं आहे, की आमचा हल्ला मंदिर आणि लोकशाहीचं मंदिर. या दोनच मंदिरांवर आम्ही हल्ला करणार आहोत. त्यामुळे आम्ही मंदिरं बंद ठेवतो आणि अधिवेशनाचं लोकशाहीचं मंदिर बंद ठेवतो. बाकी आम्ही सगळं सुरू ठेवतो कारण, करोना विषाणू सांगतो की आम्ही बिअर बारमध्ये हल्ला करणार नाही. नवीन काही आमच्याकडे संशोधक आले आहेत. तर, आता राज्यपालांकडे १२ आमदारांसाठी मुख्यमंत्री गेले असतील, तर ते राज्याचं दुर्भाग्य आहे.” असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार टीव्ही-9 शी बोलताना म्हणाले आहेत.

विधान परिषदेवरील नियुक्त्या लवकर कराव्यात अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली असता, या प्रश्नावर योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन राज्यपालांनी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यावरून राज्यपाल विधान परिषदेवरील नियुक्त्या लगेचच करणार नाहीत हेच सूचित होते. तर, सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारकडून मंदिर उघडण्यास परवानगी दिली जात नसल्याबद्दलही टीका केल्याचे दिसून आले. भाजपा व मनेसने मंदिरांच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतलेली आहे. एवढच नाही तर सोमवारी राज्यभरात भाजपाकडून यासाठी शंखनाद आंदोलन देखील केले गेले. सुधीर मुनगंटीवार आणि ३० पेक्षा जास्त पक्ष कार्यकर्त्यांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास सुधीर मुनगंटीवार व भाजपा कार्यकर्ते दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिराबाहेर मोठ्यासंख्येने जमले होते, म्हणून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने ठरवलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी आयपीसी कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button