breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शालेय जीवनातच मुलांच्या मनात स्वाभिमान, देशप्रेम जागृत करणे गरजेचे: निवृत्त सुभेदार मेजर भागवत शिंदे

पिंपरी: “देशाचे नागरिक घडवताना शालेय जीवनातच मुलांच्या मनात लहानपणापासून देशाबद्दल आत्मियता, स्वाभिमान, देशप्रेम जागृत करणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षणाला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. मुलांनो खूप शिका, मोठे व्हा, परंतु मातृभूमीला कधीही विसरू नका.” असे प्रतिपादन निवृत्त सुभेदार मेजर आणि कॅप्टन भागवत गणपत शिंदे (वय ९३) यांनी केले. ते थेरगाव येथील प्रेरणा शिक्षण संस्थेच्या प्रांगणात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम गुजर होते. याप्रसंगी मानद सचिव कांतीलाल गुजर, सामाजिक कार्यकर्त्या स्नेहा माने, अक्षय गुजर, प्राचार्य शिवाजी ननावरे, मुख्याध्यापक महेंद्र पवार, पालक, माजी विद्यार्थी, सर्व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष तुकाराम गुजर, मानद सचिव कांतीलाल गुजर आणि निवृत्त सुभेदार मेजर भागवत शिंदे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. १९६२,६५ आणि ७१ मध्ये झालेल्या चीन आणि पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या मेजर शिंदे यांचा प्रेरणा शिक्षण संस्थेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

संस्थेचे मानद सचिव कांतीलाल गुजर म्हणाले, आपल्या सर्वांसाठी आपले राष्ट्र हेच सर्वोच्च आहे. राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती आपल्या जीवनात प्रमुख गोष्ट आहे. विद्यार्थी जीवनात शिक्षकांनी मुलांना राष्ट्रभक्तीच्या गोष्टी आणि उदाहरणे सांगितली पाहिजेत. देशाच्या सीमा जेव्हा सुरक्षित असतात, तेव्हाच सर्व देशवासीयांचं जीवन सुरक्षित राहत असते. म्हणूनच आपण आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या सर्व वीर आणि शूर जवानांसाठी कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक रमेश कदम, दत्तात्रय उबाळे यांनी केले. नाना शिवले यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा.शैला हिरवे यांनी प्रास्ताविक केले. रमेश कदम, अनिल नाईकरे, ज्ञानेश्वर बोरसे आणि सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button