breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘सायबर विश्वात महिलांना सुरक्षित ठेवणे प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी’;उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मिशन ई-सुरक्षा’ प्रशिक्षण उपक्रमाचा शुभारंभ

राज्यभर महिला, मुलींचा सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण; राज्य महिला आयोग व मेटाचा संयुक्त उपक्रम

नागपूर : इंटरनेट हे दुहेरी अस्त्र आहे. त्याचे फायदे तसेच काही तोटेही आहेत. इंटरनेटच्या या विश्वात महिलांना सुरक्षित ठेवणे पोलिसांसह प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग व मेटाच्या संयुक्त विद्यमाने महिलांना सायबर विश्वात सुरक्षित ठेवण्यासाठी मिशन ई-सुरक्षा हा उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. वनामती येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, खा.सुनील तटकरे, आयोगाच्या सदस्य सचिव माया पाटोळे, सदस्य ॲड संगिता चव्हाण, दीपिका चव्हाण, आभा पांडे, उत्कर्षा रुपवते, गौरी छाब्रीया, सह पोलिस आयुक्त अश्वती दोरजे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील व मेटाच्या अश्विनी देसाई उपस्थित होते.

समाजमाध्यमांमध्ये काही अपप्रवृत्ती सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करतात. महिलांची बदनामी, चारित्र्यहननासारखे प्रकार वाढले आहे. यासाठी पोलिसांचा सायबर सेल काम करतो. परंतू अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रत्येकाने सामुहिक जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. समाजमाध्यमांद्वारे महिला व मुलींची बदनामी होणार नाही. तसेच समाजविघातक प्रवृत्ती बळावणार नाही. यासाठी व्यापक जनजागृतीची देखील गरज असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

हेही वाचा – संसदेत घुसणाऱ्या तरूणांची शिक्षा सरकारने माफ करावी’; प्रकाश आंबेडकरांची मागणी

संपुर्ण जग इंटरनेटने जोडले गेले आहे. समाजमाध्यम अविभाज्य भाग झाला आहे. यापासून आपल्याला दूर जाता येणार नाही. त्यामुळे अशा माध्यमांचा वापर करतांना प्रत्येकाने सामाजिक भान, दक्षता व खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. महिलांनी या माध्यमांचा वापर करतांना अधिक काळजी घेतली पाहिजे. वाईट प्रकार घडत असल्यास त्याची तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली पाहिजे. पोलिस विभागाने देखील अशा तक्रारींवर कालमर्यादेत कारवाई करावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

राज्य शासनाच्यावतीने महिलांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीचा 3 टक्के निधी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मालमत्ता खरेदीत महिलांना स्टॅम्प ड्युटीत 1 टक्का सवलत देण्यात आली आहे. महिलांच्या कल्याणासाठी शासन मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देतो. आवश्यकता भासल्यास अधिक निधी देऊ. आयोगाच्यावतीने महिलांसाठी सुरु करण्यात आलेला मिशन ई-सुरक्षा हा उपक्रम अतिशय चांगला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, डिजीटल वापरात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वापर केला जातो. मोठ्या प्रमाणावर वापर होत असतांना वापरकर्त्यांची सायबर सुरक्षा देखील महत्वाची आहे. यासाठी आयोगाने सुरु केलेला उपक्रम अतिशय चांगला आहे. इंटरनेट, समाजमाध्यमे वापरतांना आपण देखील सजग राहून वापर केला पाहिजे.

काही गोष्टी नव्याने निर्माण होत असतांना त्याचे काही दुष्परिणामही भोगावे लागतात. वाईट प्रवृत्तींमुळे महिलांना समाजमाध्यमांवर वाईट प्रसंगांना समोर जावे लागते. बदनामीकारक, अश्लील गोष्टी समाजमाध्यमांमुळे झपाट्याने पसरतात. यावर आळा घालण्यासाठी प्रत्येकाला या माध्यमाचा सुरक्षित वापर कसा करावा, याबाबत जागृत असणे आवश्यक आहे, असे खासदार सुनील तटकरे म्हणाले.

महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मिशन ई-सुरक्षा विषयी माहिती दिली. समाजमाध्यमांमध्ये महिलांची सर्वात जास्त बदनामी होते. त्यामुळे या माध्यमांचा वापर करतांना तो सुरक्षितपणे कसा करावा, काय काळजी घेतली जावी, यासाठी राज्यभर महिला, मुलींना या उपक्रमाद्वारे सायबर सुरक्षित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुर्वी हुंडाबळी, बालविवाह, कौटुंबिक हिंसाचार हे महिलांच्या बाबतीत प्रमुख प्रश्न होते. आता सायबर सुरक्षा हा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे, असे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या. आयोगाच्या सदस्य सचिव माया पाटोळे यांनी प्रास्ताविक केले.

मेटाच्या अश्विनी देसाई यांनी यावेळी उपस्थित महिला, मुलींना समाजमाध्यमे वापरतांना घ्यावयाची काळजी, दक्षता, सुरक्षा याबाबत मार्गदर्शन केले. मेटाच्या सहकार्याने आयोगाच्यावतीने संपुर्ण राज्यभर मिशन ई-सुरक्षा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे संचलन अनिरुद्ध पाटील यांनी केले तर आभार आयोगाच्या सदस्य आभा पांडे यांनी मानले. यावेळी महिला, महाविद्यालयीन विद्यार्थ्यीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button