TOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताची 107 व्या स्थानावर घसरण

विरोधकांनी साधला मोदी सरकारवर निशाणा

नवी दिल्ली । ग्लोबल हंगर इंडेक्स 2022 मध्ये 121 देशांपैकी भारत 101 वरून 107 व्या क्रमांकावर घसरला आहे. भारताच्या शेजारील देश पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका यांनीही या निर्देशांकात भारताला मागे टाकले आहे. भूक आणि कुपोषणावर लक्ष ठेवून असणाऱ्या ग्लोबल हंगर इंडेक्सच्या वेबसाईटने याबाबत एक अहवाल प्रसिद्ध कला आहे. या अहवालातून समोर आलेल्या आकडेवारीवरून विरोधकांनी आता मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ही स्थिती लज्जास्पद असल्याची टीका आरजेडीचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी केली आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे.

या अहवालाचा संदर्भ देत काँग्रेस खासदार पी चिदंबरम यांनी ट्विट केले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 8 वर्षात 2014 पासून आपला स्कोअर खालावला आहे. माननीय पंतप्रधान कुपोषण, भूक आणि असहाय्यता या खऱ्या प्रश्नांकडे कधी लक्ष देतील? असा सवाल त्यांनी केला आहे.

चिदंबरम यांचे पुत्र आणि लोकसभा सदस्य किर्ती चिदंबरम यांनीही ट्विट करत म्हटले की, भाजप सरकार ते नाकारेल आणि अभ्यास करणाऱ्या संस्थेवर छापा टाकेल. ग्लोबल हंगर इंडेक्सच्या वेबसाइटने अहवालात म्हटले की, चीन, तुर्की आणि कुवेतसह 17 देशांनी 5 पेक्षा कमी GHI स्कोअर मिळवले आहेत. आयरिश मदत एजन्सी कन्सर्न वर्ल्डवाइड आणि जर्मन संस्था वेल्ट हंगर हिल्फे यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या अहवालात भारतातील उपासमारीची पातळी गंभीर असल्याचे वर्णन केले आहे.

2021 मध्ये भारत 116 देशांच्या यादीत 101 व्या क्रमांकावर होता, परंतु यावेळी 121 देशांच्या यादीत भारत सहा गुणांनी घसरून 107 व्या क्रमांकावर आला आहे. त्याचबरोबर भारताचा GHI स्कोअर देखील घसरला आहे – 2000 मध्ये भारत 38.8 होता. यात 2014 ते 2022 मध्ये 28.2 – 29.1 दरम्यान होता. भारताच्या रॅकिंगमधील घसरण झाल्यानंतर मोदी सरकारने गेल्या वर्षी अहवालावर टीका करत म्हटले की, ग्लोबल हंगर इंडेक्सची गणना करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत अवैज्ञानिक होती.

इंडेक्स जारी करणाऱ्या संस्थेनुसार, श्रीलंका 64 व्या, नेपाळ 81, बांगलादेश 84 आणि पाकिस्तान 99 व्या क्रमांकावर आहे. दक्षिण आशियात फक्त अफगाणिस्तान भारताच्या मागे आहे. या अहवालानुसार, अफगाणिस्तान 109 व्या क्रमांकावर आहे. दरम्यान सुदान, इथिओपिया, रवांडा, नायजेरिया, केनिया, गांबिया, नामिबिया, कंबोडिया, म्यानमार, घाना, इराक, व्हिएतनाम, लेबनॉन, गुयाना, युक्रेन आणि जमैका हे देश या निर्देशांकात भारतापेक्षा खूप वर आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button