breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत ‘बिघाडी’ ; पिंपरी अन्‌ भोसरीवर ठाकरे गटाचा दावा!

दोन्ही मतदार संघात शरद पवार गट, काँग्रेसचे काम करणार नाही : निष्ठावंत शिवसैनिकांकडून विधानसभा निवडणुकीसाठी ‘बंडाची मशाल’

पिंपरी । प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीतील दमदार यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या स्थानिक पदाधिकारी- कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. मात्र, मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि शरद पवार गटाने ‘मशाल’ चिन्हावर लढणाऱ्या संजोग वाघेरे यांचे प्रभावीपणे काम केले नाही. असा आक्षेप जाहीरपणे घेत ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ‘बंडाची मशाल’ हाती घेतली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये ठाकरे गटाची मोठी ताकद आहे. या ठिकाणी पक्षाकडे प्रभावी उमेदवार आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी ठाकरे गटाच्या उमेदवारांना संधी द्यावी. अन्यथा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराचे काम करणार नाही, असा आक्रमक पवित्रा ठाकरे गटाने घेतला आहे.

आकुर्डी येथील शिवसेना भवन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची विधानसभानिहाय आढावा बैठक पार पडली. यावेळी शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, उपजिल्हा प्रमुख रोमी संधु, युवा सेना युवा अधिकारी चेतन पवार, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी सचिन सानप यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

‘‘लोकसभा निवडणुकीत भोसरीतून आम्ही ‘तुतारी’चे प्रामाणिक काम केले. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना चांगली मताधिक्य मिळवून दिले. मात्र, मावळमध्ये शरद पवार गट आणि काँग्रेसने आपल्याला म्हणावी तशी मदत केली नाही. आता आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. मतदार संघामध्ये ज्या पक्षाची ताकद जास्त आहे. त्याच पक्षाला तो मतदार संघ सोडण्यात यावा. त्यामुळे पिंपरी आणि भोसरीत शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार द्यावा. राष्ट्रवादी अथवा काँग्रेसच्या उमेदवाराचे काम करणार नाही.’’, अशी सडेतोड भूमिका शिवसैनिकांनी बैकीत मांडली.

सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट, गौतम चाबुकस्वार इच्छुक…

शिवसेना ठाकरे गटाकडून भोसरी विधानसभा मतदार संघातून माजी गटनेत्या सुलभा उबाळे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट इच्छुक आहेत. उबाळे यांनी निवडणूक नियोजन व प्रचाराच्या कामाला सुरूवातही केली आहे. पिंपरी विधानसभा मतदार संघातून माजी आमदार गौतम चाबुकस्वार तीव्र इच्छुक आहेत. पिंपरी आणि भोसरी ठाकरे गटाला सोडल्यास राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून चिंचवड विधानसभा लढवली जाईल. त्यातच ‘निष्ठावंतांना संधी’ या मागणीमुळे महायुतीतील संभाव्य बंडोखोरांची अडचण होईल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीतील इतर पक्षांच्या तुलनेत शिवसेनेची ताकद निश्चितच अधिक आहे. २०१४ ते २०१९ पिंपरी मतदार संघ शिवसेनेकडे होता. शिवसेनेला मानणारा वर्ग त्या ठिकाणी मोठा आहे. भोसरीत देखील आमची मोठी ताकद आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार देण्याचा वरिष्ठांकडे आग्रह धरला आहे.
– ॲड. सचिन भोसले, शहरप्रमुख, शिवसेना (उद्धव ठाकरे). 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button