TOP Newsताज्या घडामोडीविदर्भ

 बदनामी होऊ नये म्हणून आईचे दागिने केले प्रियकराच्या स्वाधीन

प्रेयसीचे अश्लील छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन प्रेयसीला एक लाख रुपये खंडणीची मागणी केली. बदनामी होऊ नये म्हणून प्रेयसीने चक्क आईचे जवळपास एक लाख रुपयांचे दागिने प्रियकराच्या स्वाधीन केले.आईने दिवाळीनिमित्त सोन्याच्या दागिन्याचा डबा खाली काढला असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी प्रियकराविरुद्ध खंडणी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १७ वर्षीय मुलगी रिया (काल्पनिक नाव) बाराव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. तिचे वडील जिल्हा परिषदेत अधिकारी आहेत. आई गृहिणी असून तिला मोठा भाऊ आहे. तिचे ‘स्नँपचॅट’वर ‘अकाऊंट’ आहे. तिची कुणाल गणेश यादव (२७, रा. मानेवाडा रोड, अजनी) याच्याशी ओळख झाली. बेरोजगार आणि दारूडा असलेल्या कुणालने स्वत:ला विज्ञान शाखेचा पदवीधर असल्याचे रियाला सांगितले.

दोघांची ‘ॲप’वरूनच मैत्री झाली आणि एकमेकांना मोबाईल क्रमांक दिले. काही दिवस ‘व्हॉट्सॲप’वरून गप्पा केल्यानंतर त्याने रियाला फुटाळा तलावावर भेटायला बोलावले. ती मैत्रिणीसह भेटायला गेल्यानंतर त्याने एका महागड्य हॉटेलमध्ये तिला पार्टी दिली. स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असून मोठा शासकीय अधिकारी बनणार असल्याचे त्याने तिला सांगितले. त्यानंतर दोघांच्या भेटी व्हायला लागल्या. बेरोजगार असलेल्या कुणालने रियाला पुस्तके घेण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली. तिने लगेच वडिलांकडून पैसे घेऊन कुणालला दिले. त्यामुळे कुणालची हिंमत वाढली.

त्याने रियाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अंबाझरी तलावावर नेऊन तिचे अश्लील छायाचित्र काढले. त्यानंतर तो रियाला वारंवार पैशाची मागणी करू लागला. प्रियकर असल्यामुळे ती आईवडिलांकडून पैसे घेऊन प्रियकराला द्यायला लागली. कुणाल यादवने रियाला एक लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास अश्लील छायाचित्र प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून तिने कपाटात ठेवलेले जवळपास एक लाख रुपयांचे आईचे दागिने कुणालला दिले. त्यानंतरही वारंवार तिला पैशासाठी त्रास देत होता. दर महिन्याला ती कुणालला पैसे नेऊन देत होती. तसेच तो तिला फिरायला नेऊन तिच्याशी गैरकृत्य करून अश्लील छायाचित्रही काढत होता.

दिवाळी असल्यामुळे रियाच्या आईने दागिन्यांना पॉलिश करण्याची तयारी केली. परंतु, कपाटात दागिन्यांचा डब्बा रिकामा होती. मुलीला विचारणा केली असता तिने प्रियकराला दिल्याची माहिती दिली. आईने पाचपावली ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजेश डोंगरे यांच्याकडे तक्रार केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button