ताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमुंबईराष्ट्रिय

नद्या पुनरुज्जीवित केल्यास पाण्याची वणवण थांबेल – डॉ. जी. बी. देगलूरकर

मुंबईः पाच हजार वर्षांपूर्वी लुप्त झालेल्या सरस्वती नदीच्या शोध मोहिमेला जगदीश गांधी यांनी वैज्ञानिक दृष्टी दिली व अखंड परिश्रमातून सरस्वती नदीचे पंचवीस किलोमीटर पात्र पुनरुज्जीवित केले. अशा प्रकारे भारतातील सर्व नद्यांबाबत काम केल्यास आपल्या देशाची पाण्याची वणवण संपेल असा विश्वास वास्तुशिल्प शास्त्राचे जेष्ठ अभ्यासक प्राचार्य डॉ. जी. बी. देगलूरकर यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र विकास केंद्र संस्थेचा दहावा जलमित्र पुरस्कार मुंबई येथील श्री सरस्वती हेरिटेज संस्थेचे चेअरमन व जेष्ठ नदी अभ्यासक जगदीशभाई गांधी यांना डेक्कन कॉलेज आणि अभिमत विद्यापीठाचे माजी प्राचार्य डॉ. जी. बी. देगलूरकर यांच्या शुभहस्ते देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी डॉ. विजय परांजपे कार्यक्रमाचे अध्यक्ष व वनराईचे रविंद्र धारिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राचार्य देगलूरकर म्हणाले की, ‘उद्धरित आत्मा आत्मान:’ म्हणजे आपला उद्धार आपणच केला पाहिजे. सरकार तो करेल अशी वाट बघण्यात अर्थ नाही, असे सांगून गंगेला पृथ्वीवर येण्यासाठी भाग पाडणाऱ्या भगीरथाप्रमाणे जगदीशभाईंनी सरस्वतीला पुनर्जीवित केले आहे. आपली संस्कृती सिंधू नसून ती सरस्वती संस्कृती म्हणजेच जगातील सर्वात जुनी संस्कृती आहे. हीच खरी भारतीय संस्कृती समजले जाते. सरस्वती नदीच्या काठावरील चौदाशे प्राचीन स्थाने व अनेक ऐतिहासिक मानवी संस्कृती स्थळांची माहिती सांगून सरस्वती नदीचे असाधारण महत्व देगलूरकर यांनी विशद केले.

डॉ. विजय परांजपे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतांमध्ये कोणत्याही कामात नैसर्गिक आणि कृत्रिम अडचणी येतात पण सुंदर कामाची केवळ प्रशंसा न करता येणाऱ्या बदलांचा विचार करून आपले प्रयत्न चालू ठेवले पाहिजे असे सांगितले. हवामान बदल हा अपरिहार्य आहे त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. पुढील 25-30 वर्षांत पाणी वाढत जाणार आहे, कारण हिमालयातील हिमनग वितळणार आहे. त्यामुळे सरस्वतीच्या पुनर्जीवनाला मोठा फायदा होईल. त्याचबरोबर हिमनग वितळत गेल्यामुळे पंचवीस-तीस वर्षानंतर पुन्हा पाणी कमी होणार आहे, हा धोकाही लक्षात घेतला पाहिजे. असे सांगून पाण्याचा वापर कसा करावा याबाबतच सर्वच बाजूनी समाजाला मार्गदर्शन झाले तर योग्य परिवर्तन होईल असेही विजय परांजपे यावेळी म्हणाले. वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, संपूर्ण जगात 1400 कोटी हेक्टर जमीन उपलब्ध आहे पण त्यापैकी 490 हेक्टरवरच कृषी होते. अर्थात पडीक जमीन आणि रोजगाराचा प्रश्न यांचा समन्वय घातला तर आपल्या देशाचा हात कुणीही धरणार नाही. १८ टक्के पाणी वापरात आणले जाते, 6% पाणीच आपण जतन करतो. निसर्गाचे आपल्या देशावर आशीर्वाद आहेत, कारण भारतामध्ये सरासरी 1170 मिलिमीटर पाऊस पडतो असे सांगत धारिया यांनी जगदीश भाई गांधी यांचे पुरस्काराबद्दल अभिनंदन केले.

जलमित्र पुरस्काराने मी धन्य झालो असून मला सन्मानीत केल्याबद्दल महाराष्ट्र विकास केंद्राचा सदैव ऋणी राहीन, असे सांगून जगदीशभाई गांधी यांनी सरस्वती नदीच्या शोध कार्याची सविस्तर माहिती दिली. यावेळी गांधी यांनी सॅटेलाईटव्दारे घेतलेल्या छायाचित्रांसह सरस्वतीच्या उगमापासून खंबातच्या आखातापर्यंतचा तीचा प्रवास दाखवणारी स्वतः तयार केलेली चित्रफीत उपस्थितांना दाखवली. महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये गेल्या दहा वर्षातील दिलेले जलमित्र पुरस्कार आणि महाराष्ट्र विकास केंद्राची पार्श्वभूमी तसेंच उद्देश सांगून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी जलमित्र पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेलार यांनी जगदीशभाई गांधी यांना सरस्वती पुत्र ही उपाधी देत सरस्वती नदीचे पुनर्जीवन करणाऱ्या जगदीश भाई गांधी यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन केले. तसेच जलमित्र पुरस्कारामागची भूमिका स्पष्ट केली. यावेळी संस्थेला गेली दहा वर्ष सहकार्य करणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला जलक्षेत्रातील तज्ञ, अनुभवी व कार्यरत असणारे अनेक प्रमुख जलतज्ञ, अभ्यासक, मार्गदर्शक व कार्यकर्ते उपस्थित होते.

या जलमित्र पुरस्कार वितरण सोहळ्याचे निवेदन आपल्या खुमासदार शैलीने प्रा. प्रदीप कदम यांनी केले. उपस्थितांचे आभार मानून सुनील जोशी म्हणाले, की दशकपूर्ती नंतर तरुण पिढीमध्ये नवीन परिवर्तन करण्यासाठी महाराष्ट्र विकास केंद्र कायम कटिबद्ध राहील. या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव अनुक्रमे डॅा.दि.मा.मोरे व श्री.अविनाश सुर्वे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे निवृत्त कार्यकारी संचालक श्री.प्रफुलचंद्र झपके, डॉ. प्रतीक पाटील, जलसंवाद चे संपादक डॉ.दत्ता देशकर, डॉ.सतीश खाडे, महाराष्ट्र जलसंपत्ती विनिमय प्राधिकरण चे माजी सदस्य डॅा.सुरेश कुलकर्णी, मेजर बी.जी. पाचर्णे, राजेंद्र माहुलकर, डॅा.सचिन पुणेकर, प्रा.डॅा.पी.डी. साबळे, राजेंद्र घावटे, राजाभाऊ गोलांडे, रावसाहेब बढे, राजेंद्र कुंभार, मुकुंदराव शिंदे, निंबाळकर साहेब, व्ही.एन. शिंदे, साहेबराव लेंडवे, प्राचार्य सदाशिव कांबळे, झुंजारराव भांगे, संजय देवकुळे, अमित वाडेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button