ICC महिला वर्ल्ड कप : भारताची सेमीफायनलमध्ये धडक,न्युझीलंडचा 79 रन्सवर खुर्दा

नवी दिल्ली: भारतीय महिला क्रिकेटची धडाकेबाज कॅप्टन मिताली राजच्या शतकी खेळी आणि राजेश्वरी गायकवाडच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर भारताने न्युझीलंडचा धुव्वा उडवत सेमीफायनलमध्ये धडक मारलीये. भारताने न्युझीलंडचा तब्बल 186 रन्सने पराभव केलाय.
आयसीसी महिला वर्ल्ड कप 2017 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विजयीरथाची घोडदौड कायम आहे. कॅप्टन मिताली राजने 109 रन्सची शानदार शतकी खेळी केली. मितालीच्या शतकी खेळीच्या बळावर न्युझीलंडसमोर 266 धावांचा डोंगर उभा केला.
266 रन्सचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या न्युझीलंडचा संघाचा महिला गोलंदाजांनी पार धुव्वा उडवला. अवघ्या संघाचा 25.3 ओव्हर्समध्ये 79 रन्सवर खुर्दा पडला. फक्त एमी सैदरवेटने 26 रन्स करू शकली. त्याव्यतिरिक्त एकाही खेळाडूला मोठा दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
भारताकडून राजेश्वरी गायकवाडने किवीच्या संघाला सुरुंग लावला. 15 रन्स देऊन तिने 5 विकेट घेतल्यात. तर दीप्ती शर्माने 2 विकेट घेतल्यात. आता सेमीफायनलमध्ये भारताचा आॅस्ट्रेलियाशी मुकाबला आहे.