breaking-newsTOP NewsUncategorizedमहाराष्ट्रमहिला दिनराजकारणराष्ट्रिय

‘बाजारात बऱ्याच वेळा कोळणींकडून माझी फसवणूक झाली, वर्षा उसगांवकरांना सडके मासे खाऊ घालू, बदनामी केल्यानं कोळी महिला संतापल्या

मुंबई । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

‘बाजार की मच्छी के साथ बदबू फ्री’ या मच्छिमारांची बदनामी करणाऱ्या जाहिराती पाठोपाठ आता आणखी एक नवीन वादग्रस्त जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. अभिनेत्री वर्षा उसगावकर या जाहिरातीत असून ‘बाजारात बऱ्याच वेळा कोळणींकडून माझी फसवणूक झाली आहे. बाजारातल्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की, त्यावेळी मी हे पापलेट का घेतले, असे वाटून निराश झाले’ असे विधान उसगावकर यांनी या जाहिरातीत केले असून त्यावरून मच्छिमारांनी संताप व्यक्त केला आहे. काही महिन्यांपूर्वी एका ऑनलाइन मासे विक्रेत्या कंपनीने बाजारातील मासळीला असह्य दुर्गंधी येते, माशांसोबत दुर्गंधी मोफत, अशा जाहिरातीचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रसिद्ध केला होता. त्याचे कोळी समाजात तीव्र पडसाद उमटले. समाजाने कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर कंपनीने ती जाहिरात मागे घेतली होती. त्याच प्रकारची एक जाहिरात एका खासगी मासे विक्रेत्या अॅपने बनवली असून ती फेसबुकवर प्रसिद्ध करण्यात आली. दरम्यान, सोमवारी दुपारनंतर ही जाहिरात फेसबुकवरून काढून टाकण्यात आली. विशेष म्हणजे वर्षा उसगावकर यांनी या अॅपचे प्रमोशन केले आहे.

‘मला मासे खायला आवडतात. ते ताजे आहेत की नाही याची चव मला लगेच समजते पण बाजारात मासे घ्यायला जाते तेव्हा ते मासे ताजे आहेत की नाही हे त्यावेळी कळत नसल्याने माशांची निवड करता येत नाही. त्यामुळे बाजारात जाते तेव्हा बऱ्याच वेळा माझी कोळणींकडून फसवणूक झालेली आहे. विशेषतः पापलेटच्या बाबतीत. बाजारात ते पापलेट खूप ताजे आहेत, असे वाटतात. घरी आल्यानंतर त्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की त्यावेळी मी हे पापलेट का घेतले असे वाटून निराश झाले. त्यावेळी हे खासगी अॅप माझ्या आयुष्यात वरदान स्वरूपात आले.’ असे उसगावकर यांनी या जाहिरातीत म्हटले आहे.

या जाहिरातीवर मच्छिमारांनी संताप व्यक्त केला आहे. उसगावकर यांचे हे वादग्रस्त वक्तव्य अतिशय निंदनीय असून दोन वेळेच्या जेवणासाठी जीवाचे रान करणाऱ्या मासे विक्रेत्या कोळी महिलांचा हा अपमान आहे. कष्टकरी महिलांचा मराठी सिने सृष्टीतील महिला कलाकारांकडून असा अवमान होणे हे दुर्दैव आहे. यातून गरिबांच्या प्रति असलेली त्यांची मानसिकता प्रखरपणे दिसत आहे. उसगावकार यांनी याबाबत मासे विक्रेत्या कोळी महिलांची जाहीर माफी न मागितल्यास त्यांच्या शूटिंगच्या सेटवर जाऊन त्यांना सडलेले मासे खाऊ घालण्यात येतील, असा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या महिला अध्यक्ष नयना पाटील यांनी दिला आहे.

गोव्यातून आलेल्या परप्रांतीय उसगावकर यांनी महाराष्ट्रातील कष्टकरी कोळी महिलांचा केलेला अपमान कदापी सहन केला जाणार नाही. दुर्दैवाने मुंबईत बाहेरून आलेले उपरे मुंबईचे आद्य नागरिक कोळी समाजाच्या मानगुटीवर येऊन बसले असल्याचे चित्र आता रोजचे होऊ लागल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली. कोळणींचे पती स्वतः मच्छीमार असताना त्या खराब मासळी का विकतील असा सवाल करत ऑनलाइन ॲपवाले कोणत्या बोटीने मासेमारी करतात, असा प्रश्न कोळी महिलांकडून करण्यात आला आहे.

… तर न्यायालयात दावा
ज्या ऑनलाइन अॅपने ही जाहिरात प्रदर्शित केली आहे त्यांनी कोळी महिलांची माफी मागावी अन्यथा त्यांना कायदेशीर नोटीस बजावली जाईल. तसेच ही जाहिरात सर्व माध्यमातून काढण्यात यावी, तसे न केल्यास संबंधित कंपनीच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यात येणार असल्याचे माहिती समितीचे उपाध्यक्ष अॅड. कमलाकर कांदेकर यांनी दिली. याबाबत विचारणा करण्यासाठी उसगावकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button