TOP Newsताज्या घडामोडी

नाशिकमध्ये हुडहुडी, पारा ९.२ अंशावर

नाशिक : नोव्हेंबरच्या उत्तरार्धात शहरात तापमान कमालीचे घसरले असून दिवसाही कमालीचा गारवा असल्याने सर्वत्र हुडहुडी भरल्याचे चित्र आहे. सोमवारी ९.२ अंश या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. मागील दोन वर्षात नोव्हेंबर महिन्यात पारा १० अंशाचा खाली आलेला नव्हता. यंदा या पातळीच्या खाली तापमान गेले आहे.

काही दिवसांपासून वातावरणात आमुलाग्र बदल जाणवत आहे. आठवडाभरात तापमान पाच अंशानी कमी झाले. गेल्या रविवारी १४.३ अंशावर असणारे तापमान सोमवारी ९.२ अंशावर आले. दोन दिवसांपासून गारवा जाणवत असून बोचऱ्या थंडीची प्रथमच अनुभूती येत आहे. तापमान घसरल्याने भल्या सकाळी बाहेर पडणाऱ्यांना उबदार कपड्यांचा आधार घेणे क्रमप्राप्त ठरले. थंडीपासून बचावासाठी अनेक ठिकाणी शेकोट्यांचा आधार घेतला जात आहे. उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव नाशिकच्या तापमानावर पडतो. सर्वसाधारणपणे दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागते. पण नोव्हेंबर महिन्यात तापमान १० अंशाच्या खाली गेल्याचे हे अपवादात्मक उदाहरण असावे. गेल्या वर्षी ११ नोव्हेंबरला त्या महिन्यातील १२.२ या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती. २०२० च्या नोव्हेंबरमध्ये १०.४ हे नीचांकी तापमान नोंदले गेल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली. या वर्षी मात्र पारा १० अंशाच्या खाली घसरला. डिसेंबर व जानेवारीत हंगामातील नीचांकी पातळी गाठली जाते. यंदा थंडीचे आधीच आगमन झाल्यामुळे हंगामात अधिक काळ गारव्याचा आनंद मिळणार आहे.

उन्हाळ्यात टळटळीत उन्हाला आणि पावसाळ्यात अतिवृष्टीला नाशिककरांनी तोंड दिले आहे. पाऊस बराच काळ लांबला होता. त्यामुळे थंडी त्याच तीव्रतेने दाखल होईल असा अंदाज वर्तविला गेला. तिचे आगमन त्याच आवेशात झाले आहे. पुढील काही दिवसांत तापमान आणखी खाली जाऊन नवा नीचांक गाठते काय, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button