घरफोडी चोरी करणा-या दोन चोरट्याला अटक : चार लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी l प्रतिनिधी
घरफोडी चोरी करणा-या एका चोरट्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्या अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 61 ग्रॅम सोन्याचे, 140 ग्रॅम चांदीचे दागिने, चार मोबाईल फोन आणि घरफोडी करताना वापरलेली दुचाकी असा एकूण चार लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्वप्नील उर्फ मायकल शंकर कुडवे (वय 20) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वप्नील आणि त्याचा 16 वर्षीय साथीदार दुचाकीवर फिरून वाकड आणि चिखली परिसरात बंद घरांमध्ये घरफोडी करत होते. त्यांनी वाकड परिसरात चार आणि चिखली परिसरात दोन घरफोड्या केल्या होत्या.
वाढत्या घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वाकड पोलिसांनी दोन पथके तैनात केली होती. पथकातील पोलीस अंमलदार प्रशांत गिलबिले आणि आथिर्क शेख यांना प्रसुनधाम रोड वाकड येथे दोघेजण संशयितपणे जाताना दिसले. पोलिसांनी दोघांना अडवून चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी वाकड आणि चिखली परिसरात सहा घरफोड्या केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून 61 ग्रॅम सोन्याचे, 140 ग्रॅम चांदीचे दागिने, चार मोबाईल फोन आणि घरफोडी करताना वापरलेली दुचाकी असा एकूण चार लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.