चिंताजनक! विदर्भात करोनाच्या काळात पक्षाघाताच्या रुग्णांमध्ये वाढ
![Worrying! Increase in paralysis patients during Corona period in Vidarbha](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/paralysis.jpg)
- ‘१०८’ रुग्णवाहिकेच्या नोंदीतून माहिती उघड
नागपूर |
करोना महामारीच्या काळात बाधितांची संख्या वाढल्याने रुग्णालयात खाटा, औषध आणि रुग्णांना हलवण्यासाठी रुग्णवाहिकाही मिळत नव्हत्या. त्यावेळी शासनाच्या नि:शुल्क रुग्णवाहिकेद्वारा करोनाबाधितासोबतच उपचाराची गरज असलेल्या पक्षघाताच्या रुग्णांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, करोना काळात या रुग्णवाहिकेतून दाखल होणाऱ्या पक्षघाताच्या रुग्णांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत वीस टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. अमेरिकन हार्ट असोसिएशन आणि अमेरिकन स्ट्रोक असोसिएशन हे भारतातील १०८ रुग्णवाहिका सेवेचे शैक्षणिक भागीदार आहेत. अमेरिकन स्ट्रोक असोसिएशन दरवर्षी १ मे ३१ मे या दरम्यान पक्षघात जनजागृती मोहीम राबवते. या काळात इतर आजारासोबतच पक्षघाताच्या रुग्णांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेची सेवा नि:शुल्क दिली जाते.
२०१४ पासून आतापर्यंत (मे २०२१) विदर्भातील एकूण २४,४५५ पक्षघाताच्या रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला. मागील वर्षी एप्रिल महिन्यापासूनच विदर्भात करोनाचे रुग्ण सापडायला लागले होते. कालांतराने त्यात वाढ होत घेली व नंतर सरकारी आणि खासगी यंत्रणा उपचारात कमी पडू लागली. या काळात सर्वच सरकारी आरोग्य सुविधा करोनानी व्यापल्या होत्या. त्याचा भार १०८ रुग्णवाहिकेवरही होताच. याच काळात विदर्भातील काही जिल्ह्य़ात पक्षघात किंवा अर्धागवायूचा झटका या आजाराने तोंड वार काढले होते. त्या रुग्णांना वेळत उपचार मिळणे आवश्यक असते. या कामात १०८ रुग्णवाहिकेची मोलाची मदत झाली. २०२० मध्ये जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात एकूण ६७० तर याच काळात २०२१ मध्ये ८४५ रुग्णांना या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे महाराष्ट्र आपात्कालीन वैद्यकीय सेवा देणाऱ्या कंपनीचे संचालन प्रमुख डॉ. दीपककुमार उके यांनी सांगितले. हे प्रमाण २०२० च्या तुलनेत २० टक्के अधिक आहे.
- रुग्णवाहिकेतून दाखल पक्षघाताचे रुग्ण
जिल्हा २०२० २०२१ वाढ/घट
भंडारा ४४ ८१ ४५.७
चंद्रपूर १६५ २४० ३१.३
गडचिरोली ४६ ९१ ४९.५
गोंदिया १२१ १०१ १९.८
नागपूर २२९ २८६ १९.९
वर्धा ६५ ४६ ४१.३
एकूण ६७० ८४५ २०.७