‘महाविद्यालयीन शिक्षण लवकर सुरू होण्यासाठी कॉलेज विद्यार्थ्यांचे प्राधान्याने लसीकरण करा’
!['Vaccinate college students as a priority for early start of college education'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/WhatsApp-Image-2021-07-05-at-4.41.48-PM.jpeg)
- उपमहापौर हिराबाई घुले यांची मागणी
पिंपरी |
महाविद्यालयीन शिक्षण लवकर सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील कॉलेज विद्यार्थ्यांचे प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात यावे. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. कॉलेज विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र केंद्रांची निर्मिती करून लसीकरण करावे, अशी महत्वपूर्ण मागणी उपमहापौर हिराबाई घुले यांनी मा. आयुक्त यांना केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात घुले यांनी म्हटले आहे की, महापालिकेने शहरातून परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची स्वतंत्र व्यवस्था केली. परंतु, शहरात शिक्षण घेणाऱ्या कॉलेज विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. शहरात मोठ मोठ्या शिक्षण संस्था आहेत. या संस्थामध्ये शहरातील हजारो विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. ग्रॅज्युशेनचे शिक्षण विद्यार्थ्यांच्या करीअरसाठी महत्वाचा टप्पा असतो. शहरातील या कॉलेज विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांचे प्राधान्याने लसीकरण होणे आवश्यक आहे.
महाविद्यालयीन शिक्षण लवकरात लवकर सुरू होण्यासाठी काही राज्यामध्ये कॉलेज विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. त्याच धर्तीवर पिंपरी- चिंचवड शहरातील कॉलेज विद्यार्थ्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे. ज्या अभ्यासक्रमांना प्रॅक्टीकल करणे, लॅबमध्ये येणे अत्यावश्यक आहे. त्या कोर्स, महाविद्यालयांना लसीकरणात प्राधान्य द्यावे. ज्या विद्यार्थ्यांची पैसे देऊन लस घ्यायची क्षमता आहे. अशा विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी पैसे घेऊन लसीकरण केले तरी चालू शकते. कर्नाटक सरकारने असा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील कॉलेज विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. यासाठी कॉलेज विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्र केंद्रांची निर्मिती करून लसीकरण करावे, अशी विनंती उपमहापौर घुले यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे.