कोरोनाची जागतिक महासाथ संपली, WHO कडून मोठी घोषणा

WHO : कोरोनाच्या महासाथीनं जगभरात थैमान घातलं होतं. घड्याळाच्या काट्यावर चालणारं जग अचानक पूर्णपणे थांबलं होतं. कोरोनाला जागतिक आरोग्य संघटनेनं जागतिक महासाथ घोषित केलं होतं. कोरोनामुळे जगभरातील लाखो लोकांचा मृत्यू झाला. परंतु आता जागतिक आरोग्य संघटनेनं एक मोठी घेषणा केली आहे.
कोरोनाला जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणीच्या वर्गवारीतून वगळलं आहे. कोव्हिड-१९ आता सार्वजनिक जागतिक आरोग्य आणीबाणी राहिलेला नाही असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. कोरोना जागतिक महासाथ म्हणून संपल्याची घोषणा केली आहे.
जागतिक आरोग्य आणीबाणीच्या श्रेणीतून कोव्हिड-१९ काढून टाकताना, WHO ने असं म्हटलं आहे की, लोक अजूनही कोरोनामुळे मरत आहेत, आजारी पडत आहेत, ICU मध्ये दाखल होत आहेत, त्यामुळे अजूनही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. WHO ने असेही स्पष्ट केले की कोविड-१९ केवळ जागतिक आरोग्य आणीबाणीच्या श्रेणीतून काढून टाकले जात आहे, तर कोविड-१९ ची साथीची स्थिती अजूनही कायम राहील.





