breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपुणे

चांदणी चौकातील पूल अखेर जमीनदोस्त!

मध्यरात्री स्फोट : वाहतूक सुरळीत करण्याची लगबग

पुणे । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील उड्डाणपूल अखेर शनिवारी मध्यरात्रीनंतर एक वाजता मर्यादित स्फोट घडवून काही क्षणांतच जमीनदोस्त करण्यात आला. पूल पाडण्यासाठी गेल्या दोन आठवड्यांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, पोलीस आणि तांत्रिक पथकाकाडून मोठ्या यंत्रणेच्या माध्यमातून तयारी करण्यात येत होती. पाडलेल्या पुलाचा राडारोडा हटिवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले असून, राडारोडा उचलण्याचे काम पूर्ण होईपर्यंत या भागातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. चांदणी चौक आणि परिसरात सकाळी आठवाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. स्फोट घडवून पाडण्यात आलेला पुण्यातील हा पहिलाच पूल असल्याने नागरिकांमध्येही त्याबाबत प्रचंड उत्सुकता होती.

महामार्गावरील चांदणी चौकात होणारी सातत्याने वाहतूक कोंडी सोडण्याच्या दृष्टीने पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कमी वेळेत पूल पाडून त्याचा राडारोडा जमा करणे आणि वाहतूक कमी वेळेत पूर्ववत करण्यासाठी पूल स्फोटकाने पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कोची आणि नोएडा येथील जुळे मनोरे पाडणाऱ्या कंपनीलाच हा पूल पाडण्याचे काम देण्यात आले. याच कंपनीने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अमृतांजन पूल पाडण्याचे काम केले आहे. कंपनीच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला पुलाची आणि परिसराची पाहणी केली. त्यानंतर स्फोटके भरण्यासाठी छिद्रे पाडण्यात आली. त्यानंतर गेल्या चार ते पाच दिवसांपासून विविध तांत्रिक कामे पूर्ण करण्यात आली. त्यापूर्वी शुक्रवारी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या परिसराची हवाई पाहणी केली.

पूल पाडण्यासाठी सुमारे सहाशे किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला. तांत्रिक रचनेनुसार घेतलेल्या १५०० हजार छिद्रांमध्ये ही स्फोटके भरण्यात आली होती. शनिवारी सकाळपासून तांत्रिक पथकाकडून पूल पाडण्याच्या कामाची अंतिम तयारी करण्यात येत होती. शनिवारी रात्री सातारा आणि मुंबईकडून येणारी वाहतूक टप्प्याटप्प्याने थांबविण्यात आली. मुंबईकडून येणाऱ्या वाहतुकीतील हलकी वाहने तळेगाव येथूनच पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. रात्री उशिरा चांदणी चौकाच्या परिसरातील सर्व भाग निर्मनुष्य करण्यात आला. स्फोटाच्या परिसरात ठरावीक जबाबदार अधिकारी आणि तांत्रिक पथकाचीच उपस्थिती होती. तांत्रिक पथकाला सूचना मिळताच केवळ काही सेकंदाच्या अंतराने दोन स्फोट घडवून पूल पाडण्यात आला.

प्रवेशासाठी प्रतिबंध..
पूल पाडण्यासाठी रात्री आठपासूनच शेवटची तांत्रिक कामे सुरू करण्यात आली होती. स्फोटानंतर राडाराडा बाहेर उडू नये, यासाठी संपूर्ण पुलाला अच्छादित करण्यात आले. आतील भागामध्ये स्फोटाची तीव्रता कमी करण्यासाठी वाळूच्या गोण्या आणि स्पंचचा वापर करण्यात आला. रात्री अकराच्या सुमारास या भागातील सर्व वाहतूक बंद करण्यात आली. त्याचप्रमाणे परिसरातून सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात आले. पूल पाडण्याच्या कामात प्रत्यक्षात सहभागी असणाऱ्या मोजक्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना वगळता या भागात कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. रात्री बाराच्या सुमारास स्फोटकांच्या वाहिन्या मुख्य सर्किटला जोडण्याचे काम पूर्ण करण्यात आले. पूल पडण्याच्या शेवटच्या टप्प्यात सुमारे ४०० पोलीस कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढत सर्वांना बाहेर काढले. त्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचीही मदत घेण्यात आली. शेवटी दहा आकड्यांची उलटी गणना सुरू करण्यात आली आणि दहापासून ऐक म्हणताच काही सेकंदातच १९९२ मध्ये बांधलेला ३० मीटरचा हा पूल इतिहासजमा झाला. संपूर्ण पूल जमीनदोस्त होण्यास मात्र काही कालावधी लागला.

…असा पाडला पूल
चांदणी चौक येथील पूल पाडण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. १ हजार ३५० डिटोनेटरच्या सहाय्याने नियंत्रित स्फोटाद्वारे पूल पाडण्यात आला. पूल पाडण्यासाठी आणि मार्ग मोकळा करण्यासाठी १६ एक्स्कॅव्हेटर, चार डोझर, चार जेसीबी, ३० टिप्पर, दोन ड्रिलींग मशीन, २ अग्निशमन वाहन, ३ रुग्णवाहिका, २ पाण्याचे टँकर वापरण्यात येत आहेत. पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण २१० कर्मचारी एनएचएआयतर्फे नियुक्त करण्यात आले आहेत. पूल पाडण्यासाठी त्याला दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण ३५ मिमी व्यासाचे १ हजार ३०० छिद्र पाडण्यात आले होते. त्यात ६०० किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग करण्यात आला. १ हजार ३५० डिटोनेटरच्या वापरातून हा नियंत्रित स्फोट करण्यात आला. पूल पाडताना त्याचे तुकडे अथवा धूळ परिसरात उडू नये यासाठी ६ हजार ५०० मीटर चॅनल लिंक्स, ७ हजार ५०० वर्ग मीटर जिओ टेक्स्टाईल, ५०० वाळूच्या पिशव्या आणि ८०० वर्ग मीटर रबरी मॅटचा वापर आच्छादनासाठी करण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button