धक्कादायक! ‘म्युकरमायकोसिस’मुळे बीडमध्ये आठ रुग्णांनी एक डोळा गमावला
![Shocking! Eight patients lost an eye in Beed due to ‘myocardial infarction’](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Mucomicosis-e1620721883673-1-1.jpg)
- शासकीय रुग्णालयात नव्वद जणांवर शस्त्रक्रिया
बीड |
करोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच म्युकरमायकोसिसच्या बुरशीजन्य आजाराने डोके वर काढले आहे. जिल्ह्यत आतापर्यंत १४४ रुग्ण आढळले असून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नव्वद रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या आजारामुळे तब्बल आठ जणांना आपला एक डोळा गमवावा लागला. सतरा रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यत करोना पाठोपाठ आता म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढू लागले आहेत. १३ मे रोजी पहिल्या रुग्णाची नोंद झाल्यानंतर महिनाभरात ही रुग्णसंख्या दीडशेवर गेली आहे. या आजाराच्या रुग्णांवर केवळ अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात उपचार होतात.
बीडच्या जिल्हा रुग्णालयात रुग्ण आढळल्यास त्याला पुढील उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात हलविण्यात येते. त्याठिकाणी म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी नव्वद खाटांचे स्वतंत्र तीन कक्ष सुरू करण्यात आलेले असून दोन शस्त्रक्रियागृह तयार करण्यात आले आहेत. आजाराचे निदान होताच सर्व तपासण्या करून आवश्यक त्या रुग्णांवर गरजेनुसार शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय वैद्यकीय तज्ज्ञ घेतात. आतापर्यंत नव्वद जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ८२ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या असून आठ रुग्णांना मात्र आपला एक डोळा गमवावा लागला. दररोज सरासरी पाच ते सहा शस्त्रक्रिया केल्या जात असून डोळ्यांवरील शस्त्रक्रियेसाठी दीड ते दोन तास तर ईएनटी साठी तीन ते चार तासांचा वेळ लागतो, अशी माहिती स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांनी दिली. म्युकरमायकोसिसचा आजार वाढू नये यासाठी आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असून धोका वाढत असल्याने काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे